परभणीत शांतता, पण तणाव आणि भीती; पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संविधानाच्या विटंबनेवरून परभणीत बुधवारी हिंसाचाराचा भडका उडाला होता. त्यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन आजही सुरूच होते. आतापर्यंत 54 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दगडफेक, तोडफोड व जाळपोळीमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून  नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला आहे.

उच्चस्तरीय चौकशीची शिवसेनेची मागणी

परभणीत झालेली संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना आणि त्यानंतर उसळलेला हिंसाचार याकडे शिवसेनेने आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे लक्ष वेधले. ही घटना महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्याला धक्का पोहचवणारी असून राज्यातील सामाजिक सौहार्द कायम राखण्यासाठी या सर्वच घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी शहांकडे निवेदनाद्वारे केली.