
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख पहिल्यांदाच जाहीर सभेत मार्गदर्शन करणार असल्याने मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिकांचे जथेच्या जथे अंधेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स मैदानात दाखल झाले. संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते, तर सभेसाठी आलेल्या शिवसैनिकांनी भगवी वस्त्रे, टोप्या, उपरणी आणि महिलांनीही भगव्या साड्या परिधान केल्या होत्या. त्यामुळे अंधेरीत शिवसेनेचा भगवा झंझावातच निर्माण झाला.
हजारोंच्या संख्येने आलेल्या बहुतांशी शिवसैनिकांच्या हातात शिवसेनेची मशाल धगधगत होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजेरी लावलेल्या जनसमुदायात जुन्या, वयस्कर शिवसैनिकांच्या निष्ठेचे अनोखे दर्शन घडले. जालना जिह्यातून अंकुश पवार व त्यांच्या सहकारी शिवसैनिकांनी मेळाव्याच्या ठिकाणी ’मशाल’ आणली होती. हे शिवसैनिक शिवतीर्थ, ‘मातोश्री’ निवासस्थान ते अंधेरीतील मेळाव्याचे स्टेडियम असा पायी प्रवास करून आले होते. पालघर जिह्यातील गुरुनाथ दुधावडे यांनी आपण बाळासाहेबांच्या विचारांचा निष्ठावंत शिवसैनिक असल्याचा अभिमान व्यक्त करणारा फलक संपूर्ण गर्दीमध्ये फिरवला.
पोवाड्यांनी वाढवली सोहळ्याची रंगत
शिवसेना मेळाव्याच्या निमित्ताने शाहीर नंदेश उमप आणि सहकाऱयांच्या पोवाड्यांचे आयोजन करण्यात आले होते. पोवाड्यांच्या माध्यमातून उमप यांनी अवघे शिवचरित्रच डोळ्यासमोर उभे केले. ’वादळ, वारा, तुफान येऊ द्या, कुणाच्या बापाला धटायचं नाय’ यांसारख्या काही पोवाडय़ांवर तर महिलांनी नाच करीत शिवसेनेच्या जोश आणि उत्साहाचे दर्शन घडवले. शिवाय विठ्ठल उमप रचित शिवसेनाप्रमुखांवरील पोवाडाही आकर्षण ठरला.



























































