
इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामाचे वेध क्रीडाप्रेमींना लागले आहेत. चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. जगातील सर्वात मोठी लीग म्हणून इंडियन प्रीमियर लीगचा जगभरात डंका असून चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर लगचेच ही स्पर्धा सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यंदाचा हंगाम 23 मार्चपासून सुरू होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आता यात थोडा बदल झाल्याचे वृत्त ‘क्रिकबझ’ने दिले आहे.
आयपीएल 2025 ची सुरुवात 22 मार्चपासून होण्याची शक्यता आहे. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात पहिला सामना खेळला जाईल. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगेल. केकेआर घरच्या मैदानावर पहिला सामना खेळणार आहे. यासह गतविजेता सनरायझर्स हैदराबादचा संघही पहिला सामना घरच्या मैदानावर खेळणार आहे. 23 मार्च (रविवार) रोजी उप्पल येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर हैदराबादचा संघ राजस्थान रॉयल्सशी भीडणार आहे. दुपारच्या सुमारास हा सामना खेळला जाईल.
परंपरेनुसार अंतिम सामना गतवर्षीच्या विजेत्या संघाच्या शहरातच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएल 2025 चा अंतिम सामना 25 मे (रविवार) रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावरच होईल. तर यंदाच्या हंगामातील इतर सामना अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, लखनऊ, मुल्लांपूर, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, जयपूरमध्ये खेळले जातील.
महिलांची टी-20 फटकेबाजी आजपासून, गतविजेत्या आरसीबीची गाठ गुजरात जायंट्सशी
यासह गुवाहाटी आणि धर्मशाळा येथेही आयपीएलचे सामने खेळवले जातील. गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सचे दोन सामने होतील. 26 मार्च आणि 30 मार्चला कोलकाता आणि चेन्नईविरुद्ध हे सामने होण्याची शक्यता आहे. तर धर्मशाळामध्ये पंजाब किंग्जचे सामने होतील. अर्थात बीसीसीआयने अद्याप आयपीएल 2025 चे अधिकृत वेळापत्रक जारी केलेले नाही. लवकरच याबाबत घोषणा होणार आहे.
पंत महागडा खेळाडू
दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा धडाकेबाज यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील सर्वात श्रीमंत खेळाडू ठरला. लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल लिलावातील सर्व विक्रम मोडीत काढत या झुंजार खेळाडूसाठी तब्बल 27 कोटी रुपये मोजले. पंतच्या काही मिनिटे आधी पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांच्या मोबदल्यात आपल्या संघात घेतले, मात्र तो औटघटकेचा विक्रमवीर ठरला. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने 23.75 कोटी रुपयांना घेतलेला व्यंकटेश अय्यर तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला.