महिला वकिलाबद्दल अपमानास्पद टिप्पणी, न्यायमूर्ती माफी मागा! केरळ हायकोर्टात वकिलांचे आंदोलन

केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. बदरुद्दीन यांनी महिलाविरोधी विधान केल्याचा आरोप करत आज वकिलांनी कोर्टरूममध्ये आंदोलन केले. विधवा महिला वकिलाबद्दल केलेल्या कथित टिप्पणीबद्दल न्यायमूर्तीनी त्वरित माफी मागावी, अशी मागणी केरळ हायकोर्ट अॅडव्होकेट्स असोसिएशनने (केएचसीएए) केली. “महिला वकिलाने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर खटला चालवण्यासाठी वेळ मागितला. तिला अश्रू अनावर झाले. त्यात न्यायमूर्तीनी अपमानास्पद टिप्पणी केली,” असा आरोप वकिलांनी केला आहे.

एका महिला वकिलाचे पती अॅलेक्स ए. स्कारिया यांचे जानेवारीमध्ये निधन झाले. त्यामुळे त्यांनी खटला चालवण्यासाठी काही वेळ द्यावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली. मात्र न्यायमूर्ती बदरुद्दीन यांनी अॅलेक्स ए. स्कारिया कोण आहेत, अशी विचारणा केल्याने वकील संघटनेने आक्षेप घेतला.

न्यायमूर्तीनी माफी मागितली नाही तर सर्वसाधारण सभेची बैठक घेऊन त्यांच्या न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा विचार केला जाईल, असा इशारा आंदोलक वकिलांनी दिला आहे.

दरम्यान, न्यायमूर्तीनी त्यांच्या चेंबरमध्ये माफी मागण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यांनी सर्वांसमोर न्यायालयात माफी मागावी, असे केएचसीएएचे अध्यक्ष नंदकुमार एम. आर. यांनी सांगितले.