पंतप्रधानांचे 44 परदेश दौरे, पण मणिपूरमध्ये एक सेकंदही घालवला नाही; मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींवर निशाणा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मणिपूरमधील हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. कुठे आहे मोदी सरकारचा राजधर्म? गेल्या दोन वर्षांपासून मणिपूर हिंसाचाराच्या वणव्यात धगधगत आहे. पंतप्रधानांनी 44 परदेश दौरे केले. पण एक सेकंदही मणिपूरमध्ये घालवला नाही, असा घणाघात मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. मणिपूरमधील हिंसाचारावर खर्गे यांनी मोदी सरकारवर खरमरीत टीका केली आहे. 3 मे 2023 ला मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला. हा हिंसाचार अद्यापही सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच तमेंगलाँग जिल्ह्यात झालेल्या एका हिंसक घटनेत 25 जण जखमी झालेत. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत 260 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 68000 नागरिक विस्थापित झाले असून हजारो नागरिक अजूनही मदत शिबिरांमध्ये राहत आहेत, असे खर्गे म्हणाले.

मोदीजी मणिपूरमधील लोक तुमच्या भेटीची आणि राज्यात शांतत आणि स्थिती सामान्य होण्याची वाट पाहत आहेत, असे म्हणत खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना तीन सवाल केले आहेत. जानेवारी 2022 मध्ये तुमची शेवटची निवडणूक प्रचारसभा झाली. त्यानंतर तुम्ही 44 परदेश दौरे केले. देशात 250 ठिकाणी भेटी दिल्या. पण तुम्ही हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये एक सेकंदही घालवला नाही, असे खर्गे म्हणाले.

मणिपूरमधील जनता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत होती. पण तुम्ही बहुमत गमावल्यानंतर 20 महिन्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला. डबल इंजिन सरकार राजधर्म पाळण्यात अपयशी का ठरलं? मुख्यमंत्र्यांची तुम्ही आधीच हकालपट्टी का केली नाही? असे सवाल खर्गे यांनी केले. तुमचं डबल अत्याचारी सरकार मणिपूरमध्ये अजूनही अपयशी ठरलं आहे. राष्ट्रपती राजवट असतानाही हिंसक घटना थांबलेल्या नाहीत. गृहमंत्र्यांनी घोषित केलेल्या शांतता समितीचं काय झालं? पीडितांना का भेटल नाहीत? विशेष पॅकेज का जाहीर केले नाही? मोदीजी, पुन्हा एकदा तुम्ही राजधर्म पाळण्यात अपयशी ठरलात, असा टोला खर्गे यांनी लगावला आहे.