
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत भेट घेतली. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी जवळपास आर्धा तास दोघांमध्ये बैठक चालली. हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही; ओमर अब्दुल्ला यांची खंत
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींशी सिंधु पाणीवाटप करारावरील स्थगिती आणि त्याच्या परिणामांवर चर्चा केली, असे सूत्रांनी सांगितले. याचा सर्वात जास्त परिणाम जम्मू आणि काश्मीरवर होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणि पर्यटक आणि पर्यटन उद्योगासाठी परिस्थिती स्थिर करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहितीही मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांना दिली. दहशतवादाविरुद्धच्या लढाईला आणि पाकिस्तानच्या दहशतवादी छावण्या/पायाभूत सुविधांवरील कोणत्याही कारवाईला पाठिंबा असल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पुन्हा स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.