सणसवाडीत आले चक्क दोन रानगवे; वन विभागाकडून खबरदारीचे आवाहन

सणसवाडी, ता. शिरूर येथे आज सकाळी दोन भलेमोठे रानगवे नागरी वस्तीजवळ फिरताना आढळले. काही नागरिकांनी त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करताच, त्या भागात नागरिकांची गर्दी होऊ लागली, याबाबतची माहिती शिरूर वनपरीक्षेत्र अधिकारी नीळकंठ गव्हाणे यांना मिळताच, गणेगाव दुमाला परिसरात मागील आठवड्यात दोन रानगवे निदर्शनास आल्याने खळबळ उडालेली असताना, आता ते दोन्ही रानगवे सणसवाडी परिसरात आल्याने खळबळ उडाली असून, वन विभागाकडून खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे.

वनपाल गौरी हिंगणे, वनमजूर आनंदा हरगुडे, वन विभाग रेस्क्यू टीम मेंबर व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, अमोल कुसाळकर, शुभम वाघ, नेचर गार्ड ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष गणेश टिळेकर, शुभांगी टिळेकर, बाळासाहेब मोरे यांनी नागरिकांना प्राण्यांपासून लांब राहण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी अनिल भुजबळ, राजू दरेकर, सागर दरेकर, अनिल दरेकर, अमोल दरेकर, अक्षय भुजबळ आदी उपस्थित होते. तर, वन विभागाच्या माहितीनुसार गव्यांच्या कळपातून दोन रानगवे वाट चुकून आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे
आपल्या भागात आलेले गवे रात्रीत जागा बदलत असून, सध्या वन विभाग या रानगव्यांवर लक्ष ठेवून आहे. मात्र, नागरिकांनी त्यांना त्रास देऊ नये. नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन शिरूर वनपरीक्षेत्र अधिकारी नीळकंठ गव्हाणे यांनी केले आहे.