
प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅपटॉप हा डोणवत गावात सुनील जगताप या नावाने राहत होता. साधाभोळा दिसणारा हा तरुण खालापुरातील गावपाड्यात जाऊन आदिवासी मुलांना शिक्षणाचे धडे देत होता. त्यांचे भविष्य कसे उज्ज्वल होईल यासाठी अहोरात्र झटत होता. त्याची ही सामाजिक बांधिलकी पाहून खालापुरातील आदिवासी त्याला देवच मानत होते, पण हा लॅपटॉप चक्क नक्षलवादीच निघाल्याने त्याचा बुरखा फाटला असून डोणवत व परिसरातील गावकरी चांगलेच हादरले आहेत.
सुनील जगताप याला सापळा रचून पुणे एटीएसने बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे खालापूरचे डोणवत गाव अचानक हिटलिस्टवर आले आहे. हा लॅपटॉप गुरुजी गेल्या सहा ते सात वर्षांपासून खालापूर तालुक्यातील डोणवत गावात एका चाळीत राहत होता. तीन वर्षे राहिल्यानंतर तेथेच रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील इमारतीत भाडेकरू म्हणून राहू लागला. सोबत कुटुंबकबिला नसल्याने सुनील रोजच हॉटेल तसेच चायनीजच्या गाडीवर पोटपूजा करत होता. तो नित्यनेमाने या परिसरातील गावपाड्यांमध्ये जाऊन आदिवासी मुलांना शिक्षण देत होता. कोणी पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नसेल तर त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगत होता. त्याची ही धडपड पाहून अनेक पालक खूश होते. आपल्या मुलांसाठी झटणारा सुनील म्हणजे देवमाणूसच आहे अशी त्याची ओळख झाली होती.
रात्री-अपरात्री कधीही घरी यायचा
सुनीलकडे एक स्कूटी होती. तो रात्री-अपरात्री डोणवतमधील आपल्या भाड्याच्या घरात कधीही यायचा. शेजाऱ्यांना त्याचं हे वागणं अनेकदा विचित्र वाटायचं, पण त्याने पांघरलेल्या शिक्षकी बुरख्यामुळे कुणालाही संशय आला नाही. मात्र आता तो नक्षलवादी असल्याची बोंबाबोंब झाल्याने सर्वच हादरले असून सुनीलने डोणवत गावात राहून नक्षलवादी कारवाया करण्यासाठी कोणकोणते प्लॅन केले असतील का, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे.