
तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे, तू खालच्या जातीची आहेस असे सांगून प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वसईत घडली आहे. रेवती निळे असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात तरुणीचा प्रियकर आणि त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी रेवती निळे ही वसईत राहत असून ती महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तिचे आयुष राणा (21) या तरुणासोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आयुष तिच्याच वर्गात शिकत होता. तो वसईच्या भास्कर आळीतील नादब्रह्म सोसायटीत राहतो. लग्नाचे आमिष दाखवून आयुषने वारंवार तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. मात्र नंतर लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर तो तिला टाळू लागला. त्याने रेवतीचा मोबाईल नंबरही ब्लॉक केला. त्यामुळे ती नैराश्यात होती. अखेर तिने आयुषच्या पालकांशी संपर्क साधला. तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे, तू खालच्या जातीची असल्याने माझ्या मुलाचे लग्न तुझ्याशी लावून देऊ शकत नाही असे आयुषच्या वडील अजय राणा यांनी सांगितले. त्यानंतर तिने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
जादूटोण्याचा आरोप
आयुषचे वडील अजय राणा हे तांत्रिक आहे. ते रेवतीवर विविध धार्मिक विधी करत होते. तिच्या हाताला बांधण्यासाठी दोरा दिला होता. अनेकदा तिच्या बॅगेत ठेवण्यासाठी राख देत होते. असे केल्याने तुझ्यातील दोष दूर होईल आणि तुझे लग्न लावून देता येईल असे राणा सांगत होते, असा आरोप रेवतीचा भाऊ दिनेश काळे याने केला आहे