
कल्याण-डोंबिवली महापालिकेत सध्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवृत्त होत असल्याने प्रशासनावर कामाचा भार वाढला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी पालिकेत तब्बल 1 हजार 76 पदांची मेगाभरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पालिकेत कामकाजाचा बोजा वाढल्याने 2021 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या 757 पदांच्या भरतीला आता 1 हजार 76 पदांपर्यंत वाढ झाली आहे. या भरतीसाठी टीसीएस कंपनीतर्फे ऑनलाइन पद्धतीने भरती केली जाणार आहे. याबाबत पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. केडीएमसीमध्ये केवळ अनुकंपा तत्त्वावरच भरती झाली होती.
शासन दरबारी मुद्दा मांडणार
महापालिकेतील तांत्रिक पदांपासून आरोग्य विभागातील डॉक्टर, तृतीय व चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी आणि लिपिक पदांपर्यंत जवळपास निम्म्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे ही भरती प्रशासनासाठी अत्यंत आवश्यक आहे. या भरतीसाठी शिवसेना भूमिपुत्रांच्या बाजूने ठामपणे उभी राहणार असून शासन दरबारी हा मुद्दा मांडणार असे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.