
छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या करेगुट्टा टेकडय़ांमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज जोरदार चकमक उडाली. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला. यात 20 हून अधिक नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. दोन दिवसांपूर्वी करेगुट्टा टेकडीवर झालेल्या चकमकीत जवानांनी एका महिला नक्षलवाद्याला ठार मारले होते. त्यावेळी घटनास्थळावरून मृतदेह आणि शस्त्र जप्त केली.
गेल्या 14 दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत सुरक्षा दलाने आतापर्यंत एपूण 4 महिला नक्षलवाद्यांना ठार केले आहे. दरम्यान, मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा हेदेखील नक्षलवाद संपवण्यासाठी सातत्याने धोरणे आखत आहेत. परंतु, नक्षलवाद्यांकडून कारवाया सुरूच असल्याचे चित्र आहे. प्रत्येक अहवाल केंद्र सरकारला दिला जात आहे. गेल्या दीड वर्षात एकटय़ा बस्तरमध्ये 350 हून अधिक नक्षलवाद्यांचा सामना झाला आहे. आता मोठय़ा नक्षलवादी नेत्यांना घेरले जात आहे.