
‘बँकेतून घेतलेले कर्ज फेडू शकले नाही म्हणून विदर्भामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आमच्या विदर्भात अनेकजणांनी संस्था खाऊन विकून टाकल्या. ते कोणत्या पक्षाचे आहे त्याला महत्त्व नाही. पैसा कमवणे हा गुन्हा नाही, पण राजकारण हा पैसा कमवण्याचा धंदा नाही,’ अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुनावले आहे. ‘देशातील शेतकरी हा अन्नदाता झाला, ऊर्जादाता झाला, आता तो ‘हायड्रोजनदाता’ झाला पाहिजे,’ असेही ते म्हणाले.
लोणी या ठिकाणी विविध विकासकामांचे उद्घाटन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
‘भारतमाला’ प्रकल्पाअंतर्गत सुरत ते चेन्नई या हरित मार्गावर 1600 किलोमीटरचा रस्ता केला जात असून दिल्ली ते चेन्नई अंतर 320 किलोमीटरने कमी होणार आहे. हा ऑक्सिस पंट्रोल एक्स्प्रेस हायवे महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि सोलापूर जिह्यांतून जात आहे. 42 हजार कोटींचा हा प्रोजेक्ट असून या प्रकल्पाकरिता राज्यातील पाच जिह्यांतील शेतकऱ्यांची 4231 हेक्टर जमीन सरकार मोबदला देऊन हस्तांतरित करणार आहे.
अहिल्यानगरमध्ये यायला लाज वाटते!
नगर ते शिर्डी रस्तेकामासंदर्भात नाराजी व्यक्त करताना मंत्री गडकरी म्हणाले, ‘या रस्तेकामाचा ठेकेदार का टिकत नाही? आतापर्यंत तीन निविदा रद्द झाल्या. या तिन्ही ठेकेदारांना ‘काळ्या यादी’त टाकून त्यांची बँक गॅरंटी जप्त करा. आता आम्ही चौथी निविदा काढली असून लवकरच याचे काम पूर्ण होईल, मात्र या भूमिपूजनाला मला बोलावू नका. कारण आता मलाच लाज वाटते,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.