
‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ असाच काहीसा एमएमआरडीएचा कारभार असल्याचे समोर आले आहे. ऐरोली-काटई या उन्नत मार्गावर गुरुवारी रात्री मिशन गर्डर हाती घेण्यात आले होते. मात्र कंत्राटदाराने घिसाडघाईने केलेल्या कामामुळे या पुलावरील गर्डर चक्क सरकले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. याबाबत माहिती मिळताच या उन्नत मार्गाच्या खालून जाणारी ट्रान्स हार्बरची वाहतूक तातडीने थांबवण्यात आली. त्यानंतर एमएमआरडीएने तिरके बसवलेल्या गर्डरच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले. मात्र यामुळे हार्बरची वाहतूक लटकल्याने हजारो रेल्वे प्रवाशांना फटका बसला असून त्यांना कामावर लेटमार्क लागलानवी मुंबई-डोंबिवली दरम्यानचा प्रवास पंधरा मिनिटांत पूर्ण करता यावा यासाठी एमएमआरडीए ऐरोली-काटई नाका हा उन्नत मार्ग उभारत आहे. या कामातील महत्त्वाचा टप्पा असलेला ऐरोली रेल्वे स्थानकासमोरील मोठ्या पुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. ट्रान्स हार्बर लाइनवरून जाणाऱ्या या पुलावर शुक्रवारी रात्री 10 गर्डर बसवण्यात आले. मात्र हे गर्डर चक्क तिरके झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले. त्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक सकाळी 7 वाजल्यापासून बंद करण्यात आली. अचानक लटकलेल्या लोकल वाहतुकीमुळे नोकरी, व्यवसायासाठी घराबाहेर पडलेल्या हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसला. वाशी, सानपाडा, पनवेल, ठाणे, ऐरोली, नेरुळ या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
… तर हाहाकार उडाला असता
उन्नत मार्गावरील हा पूल बेलापूर-ठाणे मार्ग आणि ठाणे-वाशी ट्रान्स हार्बरवरून जातो. मात्र घिसाडघाईने बसवलेले गर्डर कोसळले असते तर हाहाकार उडाला असता. त्यामुळे नियम धाब्यावर बसवून हजारो प्रवाशांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या एमएमआरडीएच्या बेफिकीर कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा अशी मागणी संतप्त प्रवाशांनी केली.
टीएमटीसाठी प्रवाशांच्या रांगा
गर्डर लोच्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले. तासन्तास स्थानकावर थांबूनही लोकल सेवा सुरळीत होत नसल्याने मेटाकुटीला आलेल्या प्रवाशांनी स्थानकाबाहेरील रिक्षा तर काही जणांनी टीएमटीची वाट धरली. प्रवाशांच्या या गैरसोयीचा फायदा घेत काही ठिकाणी रिक्षाचालकांनी जादा प्रवास भाडे आकारून लुटालुट केली. दरम्यान, टीएमटीसाठी ठिकठिकाणी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ठाणे सेंटिस पूल ते घणसोली, तुर्भे या मार्गावर टीएमटीने 18 जादा बसेस सोडल्या होत्या.
एमएमआरडीएने बसवलेले गर्डर झुकलेले आढळून आले. त्यामुळे दुरुस्तीसाठी सकाळी 7.10 पासून लोकल वाहतूक बंद करण्यात आली होती. – डॉ. स्वप्नील नीला, (मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे)


























































