
महावितरणकडून ग्राहकांवर अनामत रकमेचा बोजा पडला आहे. यावेळी महावितरणने नियमित वीज बिलासह अतिरिक्त सुरक्षाठेव, अशी दोन बिले पाठवली आहेत. ही बिले भरणे गरजेचे असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. या अनामत रकमेमुळे ग्राहकांचा खिसा रिकामा होणार आहे.
चिपळूण शहरातील नागरिकांना एप्रिल महिन्याचे वीज बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव असे स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. ही दोन्ही बिल भरण्यासाठी महावितरणने ग्राहकांना सक्ती केली आहे. पुढील आर्थिक वर्षात जर या ग्राहकांचा वार्षिक वीज वापर 7 हजार 200 रुपये झाला तर सरासरीप्रमाणे सुरक्षा ठेवीची रक्कम 1200 रुपये होईल. या परिस्थितीत ग्राहकाचे पूर्वी जमा असलेले 1 हजार रुपये वजा करून त्याला फक्त 200 रुपये अतिरिक्त भरावे लागतील अशा सुचना महावितरणने दिल्या आहेत.
ग्राहकांचा विरोध
अनामत रक्कम भरण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहकांनी विरोध दर्शवला आहे. चिपळूण शहरातील काही नागरिक या संदर्भात माहिती घेण्यासाठी महावितरण पंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या वेळी भैय्या कदम यांनी अनामत रकमेसंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी महावितरणकडे जमा असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांचीच रक्कम असून वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करतेवेळी ती व्याजासह परत केली जाते अशी माहिती यावेळी कार्यकारी अभियंता अमित गेडाम यांनी दिली.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वीजपुरवठा संहिता 2021च्या विनयम बारनुसार वीज ग्राहकांकडून सुरक्षा आकारली जाते. या ठेवीची दरवर्षी पुनर्गणना केली जाते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर मागील एका वर्षातील ग्राहकांच्या वीज वापराच्या सरासरीनुसार विनियम 13.1 नुसार ग्राहकांनी भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित दरानुसार वीज बिलामध्ये व्याज समायोजित करून ग्राहकांना परत केली जाते. – अमित गेडाम, कार्यकारी अभियंता