वाघाच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू

चंद्रपूरमध्ये सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी मूल तालुक्यातील महादवाडी येथे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या विमला शेंडे (68) यांच्यावर वाघाने हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

चंद्रपूर जिह्यात तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. तेंदूपाने गोळा करण्यासाठी गावातील महिला, पुरुष, मूल, मुली सकाळीच जंगलात जातात. उन्हाच्या तीव्रतेने पाण्याच्या शोधात वाघ जंगलात फिरत असतो. त्याचवेळी तेंदूपत्ता तोडण्याचे काम सुरू असते. जंगलात माणसाला बघून वाघ हल्ला करतात.  नागाला या गावातील रहिवासी असलेल्या विमला गावातील महिलांसोबत सकाळीच जंगलात गेल्या होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने विमला यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच वन खात्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, वाघाच्या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.