
भरधाव थार वाहनाने कोथरूड येथील निंबाळकर चौकात रस्त्याकडेला पार्क केलेल्या पाच दुचाकींना उडवले. त्या ठिकाणी कोणीही उभे नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून संबंधित चालकाला अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ऋषी पुजारी (31, रा. कोथरूड) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत विश्वेश विजय देशपांडे (41, रा. पौड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी पुजारी हा हॉटेल व्यावसायिक आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास निंबाळकर चौकातील युफोरिया बाय खेळिया या दुकानासमोर हा प्रकार घडला.
देशपांडे यांचे खेळण्यांचे दुकान असून त्यांच्या दुकानासमोरील पार्किंगमध्ये काही दुचाकी उभ्या होत्या. अचानक मोठा आवाज झाल्याने त्यांनी बाहेर धाव घेतली असता काळय़ा रंगाच्या थार गाडीने दुचाकाRना धडक दिल्याचे दिसून आले. धडकेत पाच दुचाकीचे मोठे नुकसान झाले. देशपांडे यांनी चालक ऋषी पुजारी याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले असता तो तेथून पसार झाला. देशपांडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पुजारीला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, पुजारी याने मद्यप्राशन केले होते का, याबाबत मेडिकल तपासणी करण्यात आली असून ती नीरंक आल्याची माहिती अलंकार पोलिसांनी दिली.