
राज्याचे उपमुख्यमंत्री नांदेड जिल्ह्यात असताना आज दुपारी 12 वाजता वसरणी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ झालेल्या गोळीबारात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास वसरणी येथे जलशुद्धीकरण पेंद्राजवळ किरकोळ वादातून गोळीबार झाला. आशू पाटील ऊर्फ कमलेश लिंबापुरे आणि शेख परवेज व तेजासिंग बावरी यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यवसान भांडणात झाले. आशू पाटील ऊर्फ कमलेश याने स्वतःच्या बंदुकीतून शेख परवेज व तेजासिंग बावरी यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात शेख परवेज (25) हा जागीच ठार झाला तर तेजासिंग बावरी हा गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी आढळलेली रिकामी काडतुसे जप्त करण्यात आली आणि घटनेचा पंचनामा करण्यात आला. गोळीबार करणारा आशू पाटील ऊर्फ कमलेश फरार झाला असून, त्याच्या शोधात तीन पथके तैनात करण्यात आली आहेत.