89 पालिका शाळांचा निकाल 100 नंबरी, दहावीचा एकूण निकाल 92 टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या शालान्त माध्यमिक अर्थात दहावी (एसएससी)च्या परीक्षेत मुंबई महापालिकेच्या 89 शाळांचा 100 टक्के निकाल लागला आहे तर 118 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. पालिका शाळांचा एकूण निकाल 92 टक्के लागला आहे. 247 माध्यमिक शाळांमधून 14 हजार 966 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 13 हजार 907 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मुंबई महापालिका शिक्षण विभागामार्फत दहावी परीक्षा निकाल वाढीसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात आली. पालिकेने स्वतःची ‘मिशन मेरिट’ सराव पुस्तिकेची निर्मिती केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण प्राप्त होण्यास मदत होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सराव होण्याकरिता शिक्षण मंडळाच्या धर्तीवर शालेय स्तरावर दहा सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात येतात. सर्व अधिकाऱयांना शाळा दत्तक देऊन मार्गदर्शन करण्यात येते. दरमहा दत्तक अधिकारी व मुख्याध्यापकांच्या सभा घेण्यात येतात. निकालवृद्धीबाबत शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. शिक्षण मंडळाच्या नियमकांची व्याख्याने आयोजित केली जातात. दरम्यान, गेल्या वर्षी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे 63 विद्यार्थी होते, तर या वर्षी 118 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. गेल्या वर्षी 79 शाळांचा निकाल 100 टक्के लागला होता तर या वर्षी 89 शाळांचा निकाल 100 टक्के लागला.

पालिकेच्या सीबीएसई शाळेचा 82 टक्के निकाल

पालिकेकडून 2020-21 मध्ये के-पूर्व विभागात मुंबई पब्लिक स्कूल पूनमनगर ही सीबीएसई मंडळाची शाळा सुरू करण्यात आली. या शाळेत सीबीएसई मंडळाच्या नियमावलीनुसार, अभ्यासक्रम सुरू आहे. 2024-25 मध्ये या शाळेत नैसर्गिक वाढीने इयत्ता दहावीचा वर्ग होता. त्यामध्ये एकूण 38 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 13 विद्यार्थी 80 टक्क्यांहून अधिक श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मिशबाह फारुखी या विद्यार्थिनीने 91 टक्के गुण मिळवले.

  • वरळी सी फेस महापालिका माध्यमिक शाळेमधील अक्षरा अजय वर्मा या विद्यार्थिनीने 96.80 टक्के गुण मिळवून पालिकेच्या सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान मिळवला.
  • गजधर पार्क माणेकजी माध्यमिक शाळेची नंदिनी शगुनलाल यादव या विद्यार्थिनीने 96.20 टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला.
  • गुंदवली मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेची सेजल शेर बहादूर यादव या विद्यार्थिनीने 95.60 टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला.