
हिंदुस्थानी लष्कराने पीओके आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला. पाकिस्तानी सैन्याचे तळ आणि नागरी वस्त्या लक्ष्य नव्हते, असे हिंदुस्थानी लष्कराने वारंवार स्पष्ट केले आहे. असे असताना पाकिस्तान सरकारने प्रसिद्धीपत्रक काढून आज पुन्हा कांगावा केला. हिंदुस्थानी लष्कराच्या हल्ल्यात 40 नागरिक ठार झाले, तर 121 जण जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तर पाकिस्तानी सैन्याचे नुकसान झाले नसल्याचा दावा करणाऱया सरकारने 11 सैनिक मारले गेल्याची कबुली दिली आहे.
जलसिंधू वाद मिटला नाही तर शस्त्रसंधी फार काळ टिकणार नाही – इशाक दार
शस्त्रसंधी झाल्यानंतरही जलसिंधू कराराला स्थगिती देण्याचा निर्णय जैसे थे ठेवण्याचा निर्णय हिंदुस्थान सरकारने घेतला. त्यामुळे पाकिस्तानी सरकार चांगलेच बिथरले असून शस्त्रसंधी कराराला तीन दिवस उलटत नाहीत तोच जलसिंधू पाणीवाटपाचा वाद मिटला नाही तर शस्त्रसंधी फार काळ टिकणार नाही, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी केली आहे. पाकिस्तानी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.