
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश जगात पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने सात शिष्टमंडळ तयार केले आहे. हे सात शिष्टमंडळ अनेक देशांना भेट देऊन दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश करणार आहे.
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गोळीबार करीत पर्यटकांची निर्घृण हत्या केली. या हल्ल्याला हिंदुस्थानच्या लष्कराने जोरदार प्रत्युत्तर देताना ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.केंद्र सरकार आता जगातील प्रमुख देशांना ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणार आहे. पाकिस्तान हा दहशतवादी पोसणारा देश असल्याचेही निर्दशनास आणून देणार आहे. 22मे नंतर या शिष्टमंडळाचा दौरा सुरू होण्याची शक्यता आहे.
संसदीय कामकाजमंत्री किरण रिजिजू यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत माहिती दिली. हिंदुस्थान एकजूट आहे. दहशतवादाच्या विरोधातील संदेश घेऊन 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळ लवकरच प्रमुख भागीदार देशांना भेट देतील. राजकारणांच्या आणि मतभेदांच्या पलीकडे राष्ट्रीय एकतेचे हे प्रतिबिंब असेल असे रिजिजू यांनी म्हटले.
या नेत्यांवर जबाबदारी
शशी थरूर (काँग्रेस), रविशंकर प्रसाद (भाजप), संजय पुमार झा (जदयु), बैजयंत पांडा (भाजप), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी), कनिमोझी (द्रमुक), श्रीकांत शिंदे (शिंदे गट).
- शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अमेरिकेला भेट देईल. भाजपचे बैजयंत पांडा यांचे शिष्टमंडळ ब्रिटन आणि फ्रान्सला जाणार आहे. त्यात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, भाजपचे निशिकांत दुबे असतील.
- द्रमुक खासदार कनिमोझी यांचे शिष्टमंडळ रशियाला भेट देईल. भाजपचे रविशंकर प्रसाद यांचे शिष्टमंडळ सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि अल्गेरियाला जातील. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ ओमान, केनिया, दक्षिण आफ्रिका आणि इजिप्तला तर जदयुचे संजयपुमार झा यांचे शिष्टमंडळ जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया या देशांना भेट देईल.