न्यू यॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिजला मेक्सिकन नौदलाचे जहाज धडकले; 19 जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

न्यू यॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिजला शनिवारी मेक्सिकन नौदलाचे एक जहाज धडकले. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेवेळी जहाजात 277 प्रवासी होते, असे सांगण्यात येत आहे. जहाज पूर्व नदीतून जात असताना हा अपघात झाला. यावेळी जहाजाचा वरचा भाग पुलावर आदळला. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती आहे. अपघातानंतर स्थानिक आणि मेक्सिकन अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

अपघाताचे वृत्त मिळाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. न्यू यॉर्क शहराच्या महापौरांनी सांगितले की, न्यू यॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिजला मेक्सिकन नौदलाचे जहाज धडकले. त्यात 19 जण जखमी झाले, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जहाजाचा वरचा भाग, ज्यावर मेक्सिकोचा एक मोठा हिरवा, पांढरा आणि लाल ध्वज फडकत होता, तो ब्रुकलिन ब्रिजवर आदळतो आणि खाली पडतो. यानंतर जहाज नदीकाठाकडे जाते, ते पाहून काठावर उपस्थित असलेले लोक पळून जाऊ लागतात. मेक्सिकन नौदलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की त्यांचे प्रशिक्षण जहाज “कुआह्तेमोक” ब्रुकलिन ब्रिजवर झालेल्या अपघातात खराब झाले आहे, ज्यामुळे त्यांचा प्रवास थांबवण्यात आला आहे.

नौदलाने सांगितले की नौदल आणि स्थानिक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या स्थितीचा आढावा घेत आहेत आणि साहित्य आणि मदत पुरवली जात आहे. कुआह्तेमोक हे एक प्रशिक्षण जहाज आहे जे मेक्सिकन नेव्हल स्कूलमधील वर्गांनंतर कॅडेट्सचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी समुद्री प्रवासावर जाते. नौदलाच्या म्हणण्यानुसार, हे जहाज यावर्षी 6 एप्रिल रोजी मेक्सिकोच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील अकापुल्को बंदरातून 277 जणांसह निघाले होते.

15 देशांच्या 22 बंदरांवर थांबण्याचा कार्यक्रम होता

हे जहाज किंग्स्टन (जमैका), हवाना (क्युबा), कोझुमेल (मेक्सिको) आणि न्यू यॉर्कसह 15 देशांमधील 22 बंदरांवर थांबणार होते. याव्यतिरिक्त, रेकजाविक (आइसलँड), बोर्डो, सेंट मालो आणि डंकर्क (फ्रान्स) आणि अ‍ॅबरडीन (स्कॉटलंड) सारख्या ठिकाणांना भेट देण्याचे नियोजन होते. एकूण 254 दिवसांच्या या प्रवासात 170 दिवस समुद्रात आणि 84 दिवस बंदरांवर थांबण्याचे नियोजन होते.