
बलुचिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले. किल्ला अब्दुल्ला जिल्ह्यातील एका बाजारपेठेजवळ भीषण बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात अनेक दुकाने जळून खाक झाली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले. या स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली नाही.
किल्ला अब्दुल्लाचे उपायुक्त रियाज खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे बाजारपेठेत मोठे नुकसान झाले आहे. अनेक दुकाने जळून खाक झाली. अनेक ठिकाणी आग लागली. बाजारासमोरील फ्रंटियर कॉर्प्स किल्ल्याच्या मागील भिंतीजवळ हा स्फोट झाला. स्फोटानंतर घटनास्थळाजवळ अज्ञात सशस्त्र लोक आणि एफसी सैनिकांमध्ये गोळीबार झाल्याचेही रियाझ खान यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. बचाव पथकाने चारही मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या स्फोटात 20 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.