
हिंदुस्थानी शेअर बाजारात आज दुपारनंतर अचानक मोठी घसरण नोंदवली गेली. बीएसई सेन्सेक्स 872 अंकांनी घसरून 81,186 वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी 261 अंकांनी खाली येऊन 24,683 वर स्थिरावला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 5.64 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी बाजार भांडवल 443.67 लाख कोटी रुपये होते, ते आज घसरून 438.03 लाख कोटी रुपयांवर आले.
घसरणीचे कारण काय?
या घसरणीमागे कोविड-19 च्या नव्या लाटेची भीती आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता यांचा प्रभाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय काही प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने बाजाराचा मूड खालावला, असंही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. झोमॅटोच्या शेअर्समध्ये 4.10 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली, तर कोचीन शिपयार्डसह इतर काही कंपन्यांचे शेअर्सही लाल चिन्हावर बंद झाले.
बीएसई सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी फक्त तीन शेअर्स टाटा स्टील, इन्फोसिस आणि आयटीसी हिरव्या चिन्हावर राहिले. उर्वरित 27 शेअर्स घसरणीसह बंद झाले. कोल इंडिया हे टॉप गेनर ठरले, तर कोचीन शिपयार्ड हे सर्वाधिक घसरणारे शेअर ठरले.