भुईबावडा घाट असुरक्षितच! ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या स्थितीत; संरक्षण कठडे ढासळले

Bhuibavda Ghat Remains Unsafe Landslide Risk at Multiple Spots, Safety Barriers Damaged

>> पंकज मोरे, वैभववाडी

कोकणातील प्रमुख घाटांपैकी दुवा मानला जाणारा घाट रस्ता म्हणजे भुईबावडा. मात्र संबंधित विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने या घाट रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. घाटात कधीही धोकादायक दरडी कोसळण्याची दाट संभवना आहे. तसेच हजारो फूट दरीकडील बाजूला संरक्षण कठडे पूर्णता ढासळले असून काही ठिकाणी बॅरल लावण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग घाटमार्गाच्या देखभाल दुरूस्ती करण्याऐवजी पडलेल्या दरडी हटविण्यातच धन्यता मानत आहे. (Bhuibavda Ghat Remains Unsafe: Landslide Risk at Multiple Spots, Safety Barriers Damaged)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रमुख चार घाट मार्ग आहेत. भुईबावडा, करुळ, आंबोली व फोंडाघाट यापैकी भुईबावडा व करुळ हे दोन घाटमार्ग पावसाळ्यात ‘डेंजरझोन’ बनतात. विशेषतः भुईबावडा घाट तर पावसाळ्यात वाहतूकीस धोकादायक बनतो. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारे महत्वपूर्ण घाटमार्ग म्हणून भुईबावडा, करुळ मार्गाची ओळख आहे. पावसाळा सुरू झाला की, भुईबावडा घाटात दरडी कोसळण्याच्या मालिका सुरू होतात.

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत अनेकदा घाट रस्त्यांवर मोठमोठया दरडी, दगड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याचे प्रकार घडले. त्यामुळे कोकणाला जोडणारे हे दोन्ही घाटमार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक वाटू लागले आहेत. गेल्या वर्षी भुईबावडा घाटात संरक्षण भिंती बांधल्या आहेत. परंतु ज्याठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे आहे त्याठिकाणी कोणतीच उपाययोजना केली गेली नाही. यावर्षी तर निर्धारित वेळे आधीच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने भुईबावडा घाटात वरील वळणात दगड गोठे येण्यास सुरुवात झाली आहे.

दरवर्षी पावसाळा आला की, भुईबावडा व करुळ घाटांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येतो. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारे हे दोन्ही घाट गेल्या काही वर्षापासून पावसाळी काळात अत्यंत धोकादायक बनले आहेत. विशेषतः भुईबावडा घाटाच्या पुनर्बांधणीसाठी भरीव निधीची आवश्यकता आहे. अन्यथा भविष्यात हा घाटमार्ग इतिहास जमा होण्याची भीती जाणकारांकडून वर्तविली जात आहे.

दोन्हीही घाटात धोकादायक वळणे आहेत. ठिकठिकाणी संरक्षण कठडे देखील ढासळले आहेत. पावसाळ्यात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतात त्याठिकाणी संरक्षण जाळी बसविणे गरजेचे आहे. धोकादायक वळणे कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी जेसीबी आणि पोकलँडच्या सहाय्याने कामे करून अशी वळणे सुरक्षित करणे आवश्यक आहे.