
न्यायालयीन सुट्ट्यांमध्ये वकिलांची काम करण्याची इच्छा नसते. त्यामुळे प्रलंबित खटल्यांचे प्रमाण प्रचंड वाढते. परंतु या प्रलंबित खटल्यांचा दोष न्यायालयावर येतो. न्यायव्यवस्थेलाच त्यासाठी जबाबदार धरले जाते, अशा शब्दांत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी संताप व्यक्त केला आहे. एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका उन्हाळी सुट्टीनंतर सूचीबद्ध करण्याची विनंती केली. यावरून सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करत वकिलाची कानउघाडणी केली.
पहिले पाच न्यायाधीश सुट्टी असूनही काम करणार आहेत. तरीही आम्हाला प्रलंबित खटल्यांचे प्रमाण वाढत असल्या प्रकरणी जबाबदार धरले जाते. परंतु प्रत्यक्षात वकीलच सुट्टीत काम करण्यासाठी तयार नसतात असे सरन्यायाधीश म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच येत्या उन्हाळी सुट्टीत 26 मे ते 13 जुलै या कालावधीत आंशिक न्यायालयीन कामकाज चालवण्याची अधिसूचना जारी केली आहे.
रजिस्ट्री सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुली राहणार
सर्वोच्च न्यायालयाची रजिस्ट्री सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली राहणार आहे. 26 मे ते 1 जून या कालावधीत सरन्यायाधीश बी.आर. गवई, न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती विक्रमनाथ, न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना हे अनुक्रमे पाचही खंडपीठांचे नेतृत्व करणार आहेत.
पाच खंडपीठे करणार काम
विशेष म्हणजे आंशिक न्यायालयीन कामकाजाच्या दिवसात सुट्टीच्या काळातील दोन ते पाच खंडपीठे काम करणार आहेत. सरन्यायाधीशांसह पाच वरिष्ठ न्यायाधीश या काळात न्यायालये चालवणार आहेत. दरम्यान, पूर्वीच्या पद्धतीनुसार उन्हाळी सुट्टीत केवळ दोनच सुट्टीतील खंडपीठे असायची. या काळात वरिष्ठ न्यायाधीशांना न्यायालये भरवण्याची सक्ती नव्हती.