
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून नवीन संघर्षाला आमंत्रण दिले. या हल्ल्याचा बदला म्हणून हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. दरम्यान, राजस्थानमधील जैसलमेर जिह्यात हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) महिला जवानांनी पीटीआयशी बोलताना पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. पहलगाम हल्ल्याने आम्हाला डिवचले. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून शत्रूला सडेतोड उत्तर मिळाले आहे. हिंदुस्थानविरोधात पुन्हा कुरापती कराल तर त्यांना आमचा सामना करावा लागेल, त्यांची गाठ आमच्याशी असेल असा निर्वाणीचा इशारा बीएसएफच्या महिला जवानांनी दिला आहे.
पहलगाम हत्याकांडानंतरची भावना व्यक्त करताना महिला बीएसएफ सैनिक जसबीर म्हणाली की, दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले पती गमावले त्यांच्या वेदना आम्हाला जाणवल्या. आम्हीही विवाहित आहोत. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांचे कार्य काwतुकास्पद आहे. त्यांना पाहून आम्हाला अभिमान वाटतो. हिंदुस्थानशी पंगा घेणे सोपे नाही हे पाकने आता तरी लक्षात घ्यायला हवे.
प्रत्येकवेळी सैन्य शत्रूवर भारी
गंगानगर, बिकानेर, जैसलमेर आणि बारमेर हे राजस्थानचे चार जिल्हे पाकिस्तानच्या सीमेजवळ आहेत. या भागात मोठय़ा प्रमाणात महिला जवानांची फौज असते. सरिता नावाच्या सैनिकाने सांगितले की, दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना जवानांसह तैनात करण्यात आले होते. अनेकदा संशयास्पद हालचाली दिसल्या पण प्रत्येकवेळी सैन्य शत्रूवर भारी पडले.
आमच्या ‘सिंदूर’ला धक्का
पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी अनेक महिलांच्या पतींचा जीव घेतला. त्यामुळे हा थेट आमच्या ’सिंदूर’ला धक्का होता. पाकिस्तान नेहमीच अशी कृत्ये करत आला आहे. मात्र, लष्कर नेहमीच दहशतवादी कारवाया हाणून पाडत आले आहे, असे बीएसएफ जवान सोनल यांनी म्हटले. हिंदुस्थानने 7 मेच्या रात्री पाकमधील दहशतवादी अड्डय़ांना लक्ष्य करत ऑपरेशन सिंदूर सुरू करताच पाकिस्तानने राजस्थानातील सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले केले.