
अधिकारी आणि ठेकेदाराच्या मिलिभगत कारभारामुळे महाड-रायगड रस्त्याची दुरवस्था झाली असून लाडवली पुलाचे कामदेखील अपूर्ण आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे यांचा ताफा अडवत प्रश्नांचा भडिमार केला. गावकऱ्यांच्या रौद्ररुपानंतर तटकरे यांनी सर्व समस्या तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
महाड-किल्ले रायगड रस्त्याची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर लाडवली पुलाचे कामदेखील अर्धवट स्थितीत आहे. म्हाप्रळ पंढरपूर रस्त्याचीदेखील अशीच अवस्था आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे हे महाडमध्ये येणार असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच आक्रमक ग्रामस्थांनी त्यांचा ताफा अडवून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
ग्रामस्थांचा आक्रोश
रस्ता आणि पुलाच्या कामाकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला. ठेकेदारांचा ढिसाळ कारभार व अधिकाऱ्यांच्या डोळेझाकपणामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे ग्रामस्थांनी तटकरे यांच्या निदर्शनात आणून दिले. दरम्यान कामाच्या दिरंगाईबाबत दरदिवशी दहा ते पंधरा हजाराचा दंड ठोठावण्याचे निर्देश दिले.