ठाण्यात नाल्यांना पूर येण्याआधीच सिग्नल पेटणार, महापालिकेने सहा ठिकाणी बसवल्या अत्याधुनिक यंत्रणा

दडी मारलेला पाऊस येत्या काही दिवसात पुन्हा सुरू होणार आहे. पावसाचा जोर वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने यंदादेखील दिले असल्याने पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. पाणी साचू नये, पावसाचे पाणी रस्त्यावर तसेच घरात शिरू नये यासाठी प्रशासनाने शक्कल लढवली आहे. महापालिकेने शहरातील महत्त्वाच्या सहा ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा बसवली असून ठाण्यातील नाल्यांना पूर येण्याआधीच रेड सिग्नल पेटणार आहे. दरम्यान, नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्याची त्वरित माहिती मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट होणार आहे.

ठाणे महापालिका हद्दीत 14 ठिकाणे अशी आहेत की त्या ठिकाणी दरवर्षी पाणी साचत असते, परंतु मागील वर्षापासून या ठिकाणी महापालिकेने पाणी खेचण्यासाठी पंप बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. यंदादेखील या ठिकाणी पंप बसविण्यात आले असून एक सुरक्षा चौकीदेखील उभारण्यात आली आहे. या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच महापालिका मुख्यालयाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष असला तरीदेखील आता नऊ प्रभाग समितीअंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. आपत्कालीन कक्षातदेखील दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी दोन ते तीन कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार प्रभाग समितीनिहाय तक्रारी घेतल्या जाऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करता येणे शक्य होणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी दिली.

वॉर रूममध्ये सेन्सर माहिती देणार
शहरातील प्रमुख असलेल्या सहा नाल्यांच्या ठिकाणी सेन्सर बसविले आहेत. या सेन्सरच्या माध्यमातून नाल्यातील पाण्याची पातळी किती आहे? धोकादायक स्थिती आहे का? याची माहिती सेन्सर तत्काळ देणार आहे. पाण्याची पातळी वाढल्यास हाजुरी येथील वॉर रूममध्ये रेड सिग्नल पेटणार आहे.

या ठिकाणी सेन्सर
सखल भागासह भरतीच्या वेळी नाल्यातून बाहेर येणाऱ्या पुराची माहिती झटकन मिळणार आहे. वृंदावन, ठाणे कॉलेज, साकेत, मुंब्रा स्मशानभूमी नाला, गायमुख, हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी नाल्यांवर सेन्सर बसवण्यात आले आहे.

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने नागरिकांचादेखील सहभाग घेतला आहे. ज्या ठिकाणी पाणी साचते त्या परिसरातील नागरिकांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे.
ग्रुपच्या माध्यमातून पाणी साचल्याचे व्हिडीओ किंवा फोटो महापालिकेला थेट पाठवू शकणार आहेत. नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्यास त्याची माहिती त्वरित मिळणार आहे.
एखाद्या वेळेस पाणी साचण्याच्या ठिकाणी कर्मचारी नसला किंवा पंप बंद पडला त्याची माहिती तत्काळ मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट होणार