
जेईई ऍडव्हान्स 2025 चा निकाल सोमवारी लागला. कश्मीरच्या तीन मुलींनी पहिल्यांदाच ही परीक्षा क्रॅक केली. मलिहा हारिस, सदफ मुश्ताक आणि जनीस अशी तिघींची नावे आहेत. तिघींनी जेईई ऍडव्हान्स परीक्षेत चमकदार कामगिरी केली. आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचा त्यांचा मार्ग आता सुकर झालाय. कश्मीरमध्ये पहिल्यांदाच तीन मुली आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. कश्मीरच्या शिक्षण व्यवस्थेतील हे एक क्रांतिकारक पाऊल मानले जात आहे. मलिहा हारिस हिला जेईई मेन परीक्षेत 99.24 टक्के मिळाले. अडचणींवर मात करत शिक्षणावर लक्ष केंद्रित केल्याचे मलिहा हिने सांगितले. आयआयटीमध्ये प्रवेश घेऊन टेक्निकल सेक्टरमध्ये काम करायचे असे ती म्हणाली. सदफ मुश्ताक पहलगाम येथील आहे. तिने जेईई मेनमध्ये 99.50 टक्के गुण मिळवले. राज्यात दहावीमध्ये ती टॉपर होती. जनीस हिने मेहनत आणि आत्मविश्वासाने परीक्षेत यश मिळवले.

























































