
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश बंदी केली होती. बुधवारी त्यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली. मात्र आज ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाने दणका देत या मनमानी निर्णयाला स्थगिती दिली. यामुळे हिंदुस्थानच्या 788 विद्यार्थ्यांसह जगभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याआधी बेकायदेशीर टेरीफवरून ट्रम्प यांना दणका मिळाला होता.
ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची पात्रता रद्द केली होती. तसेच हार्वर्डच्या केंब्रिज, मॅसेच्युसेट्स येथील विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास ते राष्ट्रीय सुरक्षेस घातक ठरेल असे म्हणत ट्रम्प यांनी बुधवारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. याला हार्वर्ड विद्यापीठाने विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ट्रम्प यांचा हा निर्णय तात्पुरता स्थगित केला. ट्रम्प सरकारने लावलेल्या परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशबंदीला हार्वर्ड विद्यापीठाने न्यायालयात आव्हान दिले होते.
काय म्हणाले न्यायालय
– अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश एलिसन बरोज यांनी आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली. पुढील सुनावणी होईपर्यंत ट्रम्प यांच्या आदेशाची अंमलबजावणी रोखण्यात आली आहे.
– 2024-25 या शैक्षणिक वर्षात हार्वर्डने सुमारे 7 हजार परदेशी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. हा आकडा हार्वर्डच्या एकूण विद्यार्थी संख्येच्या 27 टक्के आहे.