सोशल मीडिया- ट्रोलर्सचा भस्मासुर!

>> प्रभा कुडके

आपल्या हिंदुस्थानात ऑनलाइन ट्रोलिंग हे आता फार आश्चर्याचे राहिलेले नाही. ट्रोलिंग ही आता एक सर्वसामान्य बाब झालेली आहे. तुम्ही सोशल माध्यमावर आहात, म्हणजे तुम्ही कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या कारणाने ट्रोल होणार हे नक्की, परंतु आताच्या या वातावरणात होत असलेले ट्रोलिंग हे आपल्या अगदी घरा-दारात डोकावते. ट्रोलर्सचे शाब्दिक डंख अनेकदा समोरच्याचे मानसिक आणि सामाजिक खच्चीकरण करतात. हे खच्चीकरण केवळ वरवरचे नसून, अनेकदा या व्यक्तीला आयुष्यातूनही उठवतात. इतक्या भयानक पद्धतीच्या ट्रोलिंगला समाजातील अनेकांना सामोरे जावे लागत आहे. 

सामाजिक नियंत्रण, भावनिक जबरदस्ती आणि सार्वजनिक धमकीच्या स्वरूपात होत असलेलं ट्रोलिंग हे दिवसागणिक अधिक वेगाने फोफावत आहे. सोशल मीडिया आणि ट्रोलिंग या दोन्ही गोष्टी अगदी हातात हात घालून चालत आहेत. डिजिटलायजेशन युगाच्या आधीही ट्रोलर्स होतेच की, ते फक्त मर्यादित स्वरूपात आणि आवाक्यात होते. पण आता ट्रोलर्स हे रोज वेगळय़ा नावाने झुंडीनेच एखाद्यावर हमला करतात. विकृतीचा कळस गाठणारे, दुसऱयाच्या भिंतीवर थुंकणारे ट्रोलर्स हे दिवसागणिक मोठय़ा संख्येने वाढू लागलेत. विचारांची मळमळ आणि शाब्दिक जळजळ दुसऱयाच्या भिंतीवर जाऊन डकवणारे निनावी चेहरे अचानक कुठून उगवतात हेच कळत नाही.

इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात, ट्रोलिंग हे बहुतांशी अनौपचारिक होते, परंतु सध्याच्या घडीला ट्रोलिंगने असभ्यतेच्या सर्वच सीमारेषा ओलांडल्या आहेत. सध्याच्या ट्रोलिंगला एक विखारी धार आहे. व्यंगाची जागा निंदानालस्तीने घेतली आहे. शिवराळ आणि अर्वाच्य भाषा ही ट्रोलर्सची अत्यंत आवडती आहे. त्यामुळेच भाषेला विखारी स्वरूप प्राप्त झालेलं आहे. एखाद्याला फक्त दुखवणं हा ट्रोलर्सचा हेतू नसतो, तर त्याच्यावर गिधाडासारखे तुटून पडायचे हाच एकमेव ट्रोलर्सचा उद्देश असतो. एखादा माणूस समाजात शरमेने मान खाली घालेल अशी भाषा ही ट्रोलर्सची जीवाभावाची भाषा असते. त्यामुळेच कुठलाही पायपोस न बाळगता, फुकटच वायफाय किंवा स्वस्त डेटा हा ट्रोलर्ससाठी आयती पर्वणी ठरतोय.

खासकरून विशिष्ट धर्म आणि जातीबद्दल तर ट्रोलर्स अक्षरश तोंडसुख घेताना दिसतात. त्यामुळेच सध्याच्या काळात ट्रोलिंग ही विकृती राहिली नाही. तर ती सर्वसामान्य प्रमाण बनली आहे. खास ट्रोलिंग करण्यासाठी फेक अकाऊंटसची निर्मिती एका रात्रीत होते त्यावरूनच सध्याच्या काळात ट्रोलिंगचं महत्त्व समजतं. हे परिवर्तन एका रात्रीत घडलं नाही. ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि विकसित होणाऱया अल्गोरिदमने या ट्रोलर्सना एक अनोखे बळ दिलेलं आहे.

ज्येष्ठ पत्रकार, कलाकार आणि विद्वानांनादेखील ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. आता तर अगदी सर्वसामान्य नागरिकही ट्रोलर्सचं लक्ष्य होत आहेत. माध्यमांच्या क्रांतीच्या जोडीला सोशल मीडिया आला. या मीडियाने अल्पावधीत अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, परंतु याच सोशल मीडियावरील झुंडींनी अनेकांच्या तोंडचं पाणी पळवलं. खासकरून ट्रोलिंगला घाबरून राहणारे, सोशल मीडियावर फक्त काठावरचे युजर ठरतात. सोशल मीडियावर झुंडीने यथेच्छ गोंधळ घालणारे सो कॉल्ड ट्रोलर्स किती हीन पातळी गाठू शकतात हे सांगायलाच नको. ट्रोलर्सची भाषा फक्त अर्वाच्य नसते तर ही भाषा अश्लीलतेच्या सर्व सीमा ओलांडते. असभ्यतेचा कळस किती गाठू शकतो, इतका रानटी थयथयाट ट्रोलर्स करतात.

शब्दांच्या माध्यमातून डंख मारणाऱया ट्रोलर्सना याचीही जाण नसते की, त्यांच्या एका शब्दाने किंवा वाक्याने कुणाचं मन दुखावलं जाईल. साधारणत गेल्या दहा-बारा वर्षांवर नजर टाकल्यास, ट्रोलिंग हे अतिशय हीन पातळीवर उतरून होऊ लागलेलं आहे. समोरची व्यक्ती एखादी स्त्री असेल तर तिच्या चारित्र्यापासून ते तिच्या अवयवापासून ते तिच्या कुटुंबापर्यंत विटंबना करायला ट्रोलर्स मागेपुढे पाहात नाहीत. एखाद्या पुरुषाला ट्रोल करताना, त्याच्या गेल्या सात पिढ्यांच्या महिलांचा उद्धार या ट्रोलर्सकडून केला जातो. चेकाळलेले ट्रोलर्स केवळ ट्रोल करून थांबत नाहीत तर, आपण केलेल्या कृत्याचे समर्थन करत फिरतात. एखाद्याच्या मुलीवर, सुनांवर आणि कुटुंबातील अगदी छोटय़ा सदस्यांना ट्रोल करणं हा ट्रोलर्सच्या डाव्या हातचा खेळ असतो.

सध्यातर धर्माच्या चष्म्यातून बघणाऱ्या माणसांकडून आपल्या लष्करातील भगिनींचीही सुटका झाली नाही. अगदी ताजे उदाहरण घ्यायचं झाल्यास आपल्याला विक्रम मिसरी याचं घ्यावं लागेल. ट्रोलर्सनी मिसरी यांच्या कुटुंबातील स्त्रियांविषयी ओकलेली गरळ ही इतक्या विकृत पातळीवरची होती की, मिसरी यांना आपलं सोशल मीडिया अकाऊंट बंद करावं लागलं होतं. देशाच्या परराष्ट्र सचिवांची सुद्धा ट्रोलर्सकडून सुटका नाही, म्हणजे हा ट्रोलर्सचा नंगा नाच किती भयंकर आहे हे आत्ताच ओळखायला हवं.

आपण अशा एका भयावह उंबरठय़ावर आहोत की, जिथे आपले मानसिक आणि सामाजिक खच्चीकरण करणारे भस्मासुर मोकाट आनंद लुटताहेत. त्यांना कुणाचाच वचक नसल्याने, हे भयावह चित्र भविष्यात अधिकच कुरूप होणार हे नक्की…

prabhakudke@gmail.com