
तालुक्यातील बेलापूर येथे पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या घरासमोर उभ्या असलेल्या आयशर टेम्पोतून श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस पथकाने 13 लाख 52 हजार रुपयांचा ‘गोवा’ नावाचा गुटखा पकडला आहे. या कारवाईत पकडलेला गुटखा आणि टेम्पो मिळून एकूण 18 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी श्रीरामपूर तालुका पोलिसांना बेलापुरात कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार बेलापुरातील साई पेट्रोल पंपाजवळील सलमान तांबोळी नामक व्यक्तीच्या घरासमोर उभ्या असलेल्या आयशर टेम्पोची तपासणी केली असता, त्यात गोवा कंपनीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पोलिसांनी टेम्पो आणि गुटखा ताब्यात घेतला. यावेळी घटनास्थळी उपस्थित दोन कामगारांना ताब्यात घेण्यात आले. ट्रकचा मालक व गुटखा कोणाचा आहे, याचा तपास अद्यापि सुरू आहे. या कारवाईत पकडलेला गुटखा आणि टेम्पो मिळून एकूण 18 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.





























































