ट्रम्प पुन्हा नडताहेत, माझ्या फोनने हिंदुस्थान–पाकिस्तान युद्ध थांबले; आता कश्मीर प्रश्नही निकाली काढणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेली मैत्री आता देशाला महागात पडत आहे. ट्रम्प वारंवार मोदींशी नडत आहेत. ‘माझ्या फोनने हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबले. आता कश्मीर प्रश्नही निकाली काढणार’, असा नवा दावाच ट्रम्प यांनी केला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना हिंदुस्थानी लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. 100 वर दहशतवाद्यांचा खात्मा केला. दोन्ही देशांमध्ये संघर्ष वाढला होता. मात्र अचानक शस्त्र्ासंधी करण्यात आली. विशेष म्हणजे हिंदुस्थानने शस्त्र्ासंधीची घोषणा करण्यापूर्वीच ट्रम्प यांनी ‘एक्स’वर शस्त्रसंधी जाहीर केली होती. ‘माझ्यामुळेच हिंदुस्थान आणि पाकिस्तानचे युद्ध थांबले. व्यापार बंद करण्याची धमकी दिली होती’, असे ट्रम्प वारंवार सांगत आहेत. मात्र पंतप्रधान मोदी यांनी आजवर एकदाही याचा इन्कार केलेला नाही.

कश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा, मात्र…

जम्मू-कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. कश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे. तिसऱया देशाची यामध्ये मध्यस्थी, हस्तक्षेप मान्य नाही, अशी हिंदुस्थानची अनेक वर्षांची भूमिका आहे. मात्र आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या धोरणातच थेट हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी कश्मीर मुद्दय़ावर भाष्य केले. ‘माझ्या पह्नमुळे हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबले. आता कश्मीर प्रश्नही निकाली काढू’, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘बिझनेस स्टँडर्ड’ने याबाबत वृत्त दिले आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यावर मोदी सरकारने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.