टिळक नगर येथील हुक्का पार्लरवर छापा; गुन्हे शाखेची कारवाई

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील छेडा नगर जंक्शन येथल्या जय अंबे नगरात वन लाईफ कॅफे नावाचा हुक्का पार्लर असून तेथे तंबाखूयुक्त हुक्का ग्राहकांना उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुशांत सावंत यांना मिळाली. त्यानुसार  मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-6 च्या प्रभारी निरीक्षक भरत घोणे व सावंत यांच्या पथकाने त्या हुक्का पार्लरवर छापा टाकला. त्यावेळी तेथे हुक्का पार्लर चालविणारा, एक पॅशियर, दोन वेटर, आणि 20 ग्राहक असे 24 जण मिळून आले तसेच तेथे तंबाखूयुक्त हुक्कादेखील सापडला. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.