
महारेलने रे रोड स्थानकात तिकीटघर आणि पादचारी पूल उभारणीसाठी सामान्य आराखडा तयार केला आहे. त्याला मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेची मान्यता मिळाली आहे. आता या पादचारी पुलासाठी आवश्यक निधीला तातडीने मान्यता देण्यात यावी आणि पुलाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे उपनेते, आमदार मनोज जामसुतकर यांनी मुंबई महापालिकेकडे केली आहे. यासंदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांना निवेदन देण्यात आले आहे.
रे रोड स्थानकात पादचारी पूल नसल्याने स्थानिक नागरिकांची तसेच रेल्वे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मध्य रेल्वे आणि पालिकेने आवश्यक निधीला तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. महारेलने पादचारी पूल बांधकामासाठी आवश्यक निधीच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याची विनंती मध्य रेल्वे आणि पालिकेकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते, आमदार मनोज जामसुतकर यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. त्याचबरोबर मंगळवारी त्यांनी महारेल आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रे रोड स्थानकातील पादचाऱ्यांच्या गैरसोयीचा आढावा घेतला. दारुखाना आयर्न स्टील अॅण्ड व्रॅप मर्चेंट्स असोसिएशनकडून आलेल्या तक्रारी तसेच नागरिक व व्यापाऱ्यांना रे रोड रेल्वे स्थानक गाठण्यास येणाऱ्या प्रचंड अडचणींकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.