
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनावर गट-‘क’ व गट ‘ड’ मधील 490 पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी महापालिकेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पालिकेने नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. प्रशासन, लेखा, अभियांत्रिकी, विधी, अग्निशमन, क्रीडा, उद्यान आदी विभागांतील विविध पदांसाठी ही भरती असली तरी अर्ज करण्याची प्रक्रिया सुटसुटीत नसल्याने सावळागोंधळ आहे. अर्ज करण्यासाठी www.kdmc.gov.in ही अधिकृत संकेतस्थळ सतत बंद असल्याने भरती लटकली आहे. यामुळे सुशिक्षित बेरोजगारांमध्ये संताप आहे.
महापालिकेने दिलेल्या वेळापत्रकानुसार भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी 10 जूनपासून 3 जुलै रात्री 11.55 पर्यंत आहे. परंतु जाहिरात प्रसिद्धी झाल्यापासून अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आपल्या अर्जासाठी सायबर कॅफे व घरी लॅपटॉपच्या माध्यमातून प्रयत्न करत असतानाही महापालिकेची अधिकृत वेबसाईट सतत डाऊन अथवा ‘लोड’ न होण्याची समस्या उद्भवत आहे. यामुळे उमेदवार त्रस्त आहेत.
महापालिकेने भरती प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली असल्याचे सांगितले असले तरी ही माहिती मिळवणेच सध्या कठीण झाले आहे. हेल्पलाइन क्रमांक 0251-2303060 सतत व्यस्त असल्याने उमेदवार घायकुतीला आले आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळाच्या कार्यक्षमतेत त्वरित सुधारणा करावी तसेच अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
सायबर कॅफेचालकांकडून लूट
काही तरुणांनी यासाठी सायबर कॅफेत दररोज पैसे खर्च करून साईट उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येकवेळी निराशा पदरी पडत आहे. काही ठिकाणी तर सायबर कॅफेचालकांनी अर्ज भरण्याचे दर वाढवले आहेत. महापालिकेने ही संपूर्ण भरती प्रक्रिया TCS कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन आधारित असून तरुणांनी कोणत्याही दलाल किंवा आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही पालिकेने केले आहे. मात्र तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही पालिकेने अद्याप केली नसल्याने उमेदवारांकडून संताप व्यक्त होत आहे.