
रत्नागिरी शहरानजीक भाट्ये येथील नौका बांधणीच्या कारखान्यात मासेमारी नौका आणि बोलेरो गाडी जळून खाक झाली. ही दुर्घटना रविवारी (22 जून 2025) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. आग लागताच आकाशात धुराचे लोट पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दुर्घटनेवेळी बोटीच्या डागडुजीचे काम सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या आगीत मच्छिमार नौकेचे जवळपास पाच ते सात लाखांचे नुकसान झाले आहे. भाट्ये येथील नौका मालक आसिफ वस्ता यांनी आपल्या नौकेच्या डागडुजीचे काम हाती घेतले होते. भाट्ये येथे खाडीलगत नौकेच्या डागडुजीचे काम सुरू होते. गॅस वेल्डिंग मशिनच्या माध्यमातून काम सुरू असताना अचानक नौकेने पेट घेतला. शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती घटनास्थळावरील ग्रामस्थानी दिली. नौकेच्या बाजूला बोलेरो गाडी उभी होती. या गाडीनेही पेट घेतला आणि अवघ्या काही कालावधीत नौकेला व गाडीला आगीच्या महाकाय ज्वालानी वेढले.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजिवडा खाडीलगत नांगरून ठेवलेल्या मच्छीमार नौकेला दुपारी अचानक आग लागली. या आगीत मच्छिमान नौकेचे नुकसान झाले आहे.#ratnagiri #fire #fishingboat pic.twitter.com/X50PUL3ON0
— Saamana Online (@SaamanaOnline) June 22, 2025
नौकेला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यांनी भाट्ये येथील पोलीस रोहन गमरे आणि विजय आंब्रे यांना माहिती दिली. त्यांनी शहर पोलीस ठाणे आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण केले. आगीत नौका आणि बोलेरो गाडी पूर्णतः जळून खाक झाली. रविवारी सायंकाळी उशिरा पर्यंत पोलिसांकडून दुर्घटनाग्रस्त बोटीचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.