
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधीवर सहमती झाल्याची घोषणा केली आहे. दोन्ही देशांनी मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यास सहमती दर्शविली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
ट्रुथ सोशलवर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, ‘इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण आणि अंतिम शस्त्रसंधी झाली आहे. शस्त्रसंधी सहा तासांच्या आत सुरू होईल आणि इराण प्रथम त्याचं पालन करेल. इराणनं शस्त्रसंधीचं पालन केल्यानंतर, पुढील 12 तासांनंतर इस्रायल देखील शस्त्रसंधीत सामील होईल. 24 तासांनंतर युद्ध औपचारिकपणे थांबल्याचं मानलं जाईल.’
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये इराण आणि इस्रायलच्या धाडस आणि बुद्धिमत्तेचं कौतुक केलं आहे. दोन्ही देशांमधील हे युद्ध वर्षानुवर्षे चालू शकलं असतं, ज्यामुळे मध्य पूर्व उद्ध्वस्त होऊ शकलं असतं. पण असं झालं नाही आणि कधीही होणार नाही, असं ट्रम्प म्हणाले आहेत.