
आगरी-कोळी बांधवांसह लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी अंगप्रदर्शन करणाऱ्या तोकड्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. एकविरा आईचे व मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी ही बंदी घालण्यात आली असून ड्रेस कोडसंदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी 7 जुलैपासून करण्यात येणार आहे.
काही भक्त अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे देवीचे व मंदिराचे पावित्र्य धोक्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी एकविरा आई विश्वस्थ मंडळाकडे आल्या होत्या. भक्तांच्या मागणीनुसार विश्वस्थ मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला. या बैठकीत भक्तांशी वाद घालणाऱ्या मंदिरातील कर्मचाऱ्यांनादेखील समज दिली आहे.
असा असेल ड्रेस कोड
या नव्या ड्रेस कोडद्वारे शॉर्ट, मिनी स्कर्ट, वेस्टर्न कपडे, फाटक्या जीन्स, हाफ पॅण्ट व अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांना स्त्री व पुरुषांसाठी बंदी असणार आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या महिला भक्तांनी साडी, सलवार कुर्ता किंवा इतर हिंदुस्थानी पारंपरिक, पूर्ण अंग झाकलेले कपडे परिधान करावेत तर पुरुषांनी धोतर, कुर्ता पायजमा, पॅण्ट शर्ट, टी शर्ट व इतर पारंपरिक कपडे परिधान करावेत, असा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली.


























































