वसई, विरारमध्ये पुन्हा ईडीची कारवाई, 16 ठिकाणी छापेमारी

वसई विरारमध्ये सकाळपासून ईडीची कारवाई जोरात सुरु आहे. कारवाई अंतर्गत तब्बल 16 ठिकाणी छापे मारले आहेत. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारत प्रकरणात, पालिकेचे माजी नगररचना संचालक वाय. एस. रेड्डी यांच्यावरील कारवाईत मिळालेल्या माहितीनंतर हे छापे टाकण्यात आले आहेत. वसई आणि विरारमध्ये 16 ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे वसई विरार परिसरात खळबळ उडाली आहे.

रेड्डी यांच्याशी संबंधित आर्किटेक्ट, बांधकामाच्या फाईल मंजूर करून घेणारे एजंट यांच्या घरावर ही छापमारी सुरू असल्याची माहिती आहे. वसई पश्चिम 100 फुटी रोडवरील पद्माराज या इमारतीच्या समोर, दोन इनोव्हा गाड्या उभ्या असून याच गाड्यातून ईडी अधिकारी सकाळी सात वाजता वसईत आल्याचे सांगण्यात आले आहे. या इमारती मध्ये नेमके कुणाच्या घरी ईडीची छापेमारी सुरू आहे याची माहिती मिळू शकली नाही.

करण्यात आलेल्या या कारवाईचा अधिकृत तपशील अद्याप ईडीकडून जाहीर करण्यात आलेला नाही. इमारतींंना परवानी देण्यासाठी वास्तुविषारदांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केला जात असल्याचा आरोप आहे. रोख रकमेऐवजी सोन्याच्या माध्यमातून व्यवहार करण्यात आल्याची चर्चा आहे. रेड्डी यांच्यावरील कारवाईनतंर अनेक वास्तुविषारद परदेशात निघून गेले होते. मात्र प्रकरण निवळल्याचे समजून ते परतले होते.

याआधी देखील वसई आणि विरारमध्ये 13 ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. या कारवाई अंर्तगत तब्बल 9 कोटींची रोकड आणि 23 कोटींचे दागिने, सोने जप्त करण्यात आले होते.