
आपल्याजवळ जसप्रीत बुमरा नावाचा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. त्याला सात दिवस विश्रांती दिल्यानंतर संघाबाहेर बसवले जाते. हा निर्णय अविश्वसनीय आणि अवघड आहे. या निर्णयाशी कुणीही सहमत होऊ शकत नसल्याची टीका खुद्द हिंदुस्थानी संघाचे माजी प्रशिक्षक आणि माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी केली.
पहिल्या कसोटीतील पराभवापासून बुमराच्या विश्रांतीच्या चर्चांना अक्षरशः उधाण आले होते. काल हिंदुस्थानी संघाचे सहाय्य प्रशिक्षक रायन टेन डोशहाटे आणि कर्णधार शुभमन गिल यांनी बुमरा संघनिवडीसाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र तो खेळणार की नाही याबाबत अनिश्चितता कायम ठेवण्याचे कार्य केले. आज कसोटीच्या नाणेफेकीदरम्यान गिलने बुमराच्या विश्रांतीची अधिपृत घोषणा केली आणि वर्पलोडचा मुद्दा अधोरेखित करत संघाबाहेर ठेवत असल्याचे सांगितले. संघव्यवस्थापनाचा हाच प्रकार रवी शास्त्री यांना भावला नाही. या निर्णयावर त्यांचा विश्वासही बसला नाही आणि ते सहमतही झाले नाहीत. या निर्णयाचा संघावर परिणाम झाला तर हिंदुस्थानच्या हातातून मालिका गेल्याचे सर्वसामान्य मत आतापासूनच समोर येऊ लागले आहे. मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असलेल्या हिंदुस्थानला 1-1 अशी बरोबरी साधण्यासाठी बुमरा हा सर्वात मोठा फॅक्टर होता. त्याच्या नसण्याचा इंग्लंडला फायदा होईलच. पण हिंदुस्थानी संघ त्याची पोकळी कशी भरून काढतो, हा सर्वांसमोर उभा राहिलेला सर्वात मोठा प्रश्न आहे.
बुमराच्या विश्रांतीमुळे गंभीर परिणाम
बुमरावर खूप मोठा ताण असल्याचे गौतम गंभीर यांच्याकडून वारंवार दर्शविण्यात आले आहे. त्याच्या गोलंदाजीमुळे त्याच्या शरीरावर अधिक ताण येऊ नये म्हणून त्याला तीन कसोटीतच खेळविणार असल्याचे गंभीर यांनी आधीच स्पष्ट केले होते. मात्र माजी कसोटीपटू आणि चाहत्यांनी बुमराला पाचही कसोटींत खेळवावे असा आग्रह धरला होता. मात्र गंभीर यांनी तो आग्रह फेटाळून लावला. बुमराच्या अनुपस्थितीत आकाश दीपला आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. मात्र एजबॅस्टनवर हिंदुस्थान बरोबरी साधण्यात अपयशी ठरला तर त्याचे मालिकेच्या निर्णयावर गंभीर परिणाम होणार याबाबत कुणीही विचार केलेला नाही.
दुसऱ्या डावात बुमरा निष्प्रभ
लीड्सवरच्या पहिल्या कसोटीत बुमराने 83 धावांत इंग्लंडचा अर्धा संघ गारद करून जोरदार कामगिरी केली. मात्र दुसऱया डावात बुमराचा मारा निष्प्रभ ठरला. इंग्लंडच्या फलंदाजांनी शेवटच्या दिवशी बुमराविरुद्ध बचावात्मक धोरण अवलंबले. त्यांनी बुमराच्या गोलंदाजीला सन्मान देण्याचा घेतलेला पवित्रा फायदेशीर ठरला. इंग्लंडने या धोरणामुळे 371 धावांचे जबरदस्त आव्हानही सहजगत्या गाठले आणि मालिकेत 1-0 आघाडी घेण्याची किमया साधली.