प्रणाम वीरा- मला परमवीर चक्र जिंकायचे आहे!

>> रामदास कामत

कारगील युद्धात लडाखच्या खलुबर रिजलाइनवर कर्तव्य बजावत असताना वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी कॅप्टन मनोज पांडे यांना वीरमरण आले. परमवीर चक्र प्राप्त करायचेच ही आस मनी बाळगलेले कॅप्टन खरे दृढनिश्चयी योद्धा ठरले.   

कारगील युद्धात सहभागी असलेला एक असा जवान ज्याला भरती होताना झालेल्या मुलाखतीदरम्यान, “तुम्हाला सैन्यात का सामील व्हायचे आहे?’’ असे विचारले असता, “मला परमवीर चक्र जिंकायचे आहे.’’ असं ठाम उत्तर त्यांनी दिले. कारगील युद्धात त्यांनी त्यांचे हे शब्द खरे करून दाखवले. या युद्धातील अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना परमवीर चक्र जाहीर झाले, पण लष्कराचा हा सर्वोच्च पुरस्कार प्रत्यक्ष स्वीकारण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी नव्हते. त्या दृढनिश्चयी योद्धय़ाचे नाव आहे कॅप्टन मनोज कुमार पांडे.

कॅप्टन पांडे हे उत्तर प्रदेशातील सीतापूर जिह्यातील रुधा गावचे रहिवासी होते. त्यांचा जन्म 25 जून 1975 रोजी झाला. लखनौमधील हेराल्ड मॉन्टेसरी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी राणी लक्ष्मीबाई शाळेत घेतले. त्यानंतर लखनौमधील यूपी सैनिक शाळेत शिक्षण घेत असताना त्यांचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पक्के झाले. राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये त्यांची निवड झाली. 1996 मध्ये एनडीएच्या 90 व्या कोर्समध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील प्रशिक्षण आयएमए देहराडून येथे झाले. वयाच्या 22 व्या वर्षी ते स्वकर्तृत्वाने सेकंड लेफ्टनंट पदावर पोहोचले. गोरखा रायफल्स रेजिमेंटच्या 1/11 जीआर बटालियनमध्ये कमिशन मिळाले. कमिशनिंगनंतर त्यांची पहिली नियुक्ती कश्मीर खोऱयात होती. सियाचीनमध्ये असताना त्यांना बटालिक सेक्टरमध्ये जाण्याचे आदेश मिळाले, जिथे पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केली होती.

जून-जुलै 1999 दरम्यान कॅप्टन मनोज यांचे युनिट लडाखच्या बटालिक सेक्टरमध्ये तैनात होते. हे युनिट 70 इन्फंट्री ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली कार्यरत होते आणि संपूर्ण नियंत्रण 3 इन्फंट्री डिव्हिजनकडे होते. मे 1999 च्या सुरुवातीपर्यंत पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर, मुशकोह, द्रास, काकसर, चोरबाटला सेक्टर आणि बटालिक सेक्टरमध्ये चांगली घुसखोरी केली होती. शत्रूची मुख्य घुसखोरी खलुबर-पद्मा गो रिजलाइनवर होते. कॅप्टन मनोज यांच्या युनिट 1/11 जीआरला 22 ग्रेनेडियर्ससह या भागात ऑपरेशन सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

खलुबर आणि पं. 5287 कॉम्प्लेक्स ही शत्रूची सर्वात भयंकर ठिकाणे काबीज करणे खूप आव्हानात्मक होते. शत्रूने खलुबर रिजलाइनवर कब्जा केला होता आणि गमावलेला प्रदेश परत मिळवण्यासाठी शत्रूला हाकलून लावणे महत्त्वाचे होते. ऑपरेशनल प्लॅनचा एक भाग म्हणून 1/11 जीआरला खलुबर ताब्यात घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. जिथे कॅप्टन मनोज प्लाटून क्रमांक 5 चे नेतृत्व करत होते. 2/3 जुलै 1999 च्या रात्री  कॅप्टन मनोज आपल्या सैन्यासह 19700 फूट उंचीवर असलेल्या पहलवान चौकीकडे खलुबरकडे जाण्यासाठी निघाले. पुढे जात असताना टेकडीच्या दोन्ही बाजूंनी शत्रूने गोळीबार सुरू केला. कॅप्टन मनोजने आपली पलटण त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवली. उजवीकडून शत्रूला सामोरे जाण्यासाठी एक तुकडी पाठवली आणि स्वत डावीकडून शत्रूचा बीमोड करत त्यांचे दोन बंकर उद्ध्वस्त केले. तिसरा बंकर उद्ध्वस्त  करताना त्यांच्या खांद्यावर आणि पायांवर गोळ्यांचा वर्षाव झाला. त्या गंभीर दुखापतींची पर्वा न करता निर्भयपणे त्यांनी चौथ्या बंकरवर हल्ला करून ग्रेनेडने तो बंकर उद्ध्वस्त केला. कॅप्टन मनोज यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने सहा बंकरवर नियंत्रण मिळवले. शत्रूच्या अकरा सैनिकांना ठार मारले आणि त्याचबरोबर एअर डिफेन्स गनसह शस्त्रास्त्रs आणि दारूगोळा यांचाही चांगला साठा  मिळवला. त्याच क्षणी त्यांच्या कपाळावर गोळी लागली. कॅप्टन मनोज पांडे यांना वयाच्या 24 व्या वर्षी कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली. या संपूर्ण ऑपरेशनदरम्यान कॅप्टन मनोज यांच्याव्यतिरिक्त इतर सहा सैनिक हुतात्मा झाले. कॅप्टन मनोज कुमार पांडे यांना त्यांच्या उत्कृष्ट धैर्य, नेतृत्व आणि कर्तव्यनिष्ठेसाठी देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘परमवीर’ चक्र देण्यात आला.

कॅप्टन मनोज कुमार पांडे यांच्या पश्चात त्यांचे वडील गोपीचंद पांडे, आई श्रीमती मोहिनी पांडे, भाऊ मोहित कुमार पांडे आणि मनमोहन कुमार पांडे आणि बहीण श्रीमती प्रतिभा मिश्रा असा परिवार आहे.

[email protected]