गडहिंग्लज ठाण्याच्या सहायक महिला उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात, 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

गडहिंग्लज पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱया सहायक पोलीस उपनिरीक्षक नीता शिवाजी कांबळे यांना 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले. पोलीस ठाण्याच्या आवारातच ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, नीता कांबळे यांच्या केडीसीसी कॉलनी येथील घराचीदेखील झडती घेण्यात आली. याप्रकरणी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध गडहिंग्लज पोलीस ठाणे येथे अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये तक्रारदारांचे वाहन जप्त करण्यात आले होते. त्यानंतर ते वाहन सोडविण्यात आले होते. गुह्यातील कलमे कमी करून गुह्याची कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात सहायक उपनिरीक्षक नीता कांबळे यांनी साठ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोड करून चाळीस हजार रुपये देण्याचे ठरले होते.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली होती. या तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी सापळा रचला होता. यावेळी नीता कांबळे यांना चाळीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेंद्र सानप, हवालदार संदीप काशीद, हेडकॉन्स्टेबल संगीता गावडे, कॉन्स्टेबल संदीप पोवार यांनी ही कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यातच कारवाई करत महिला उपनिरीक्षकाला अटक केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.