
एसटी महामंडळाच्या बसगाड्या अर्ध्या प्रवासात ‘ब्रेकडाऊन’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या गाडय़ा दुरुस्त करण्यासाठी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनाही पाठवले जात आहे. वास्तविक प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिलेले नाही. अशा परिस्थितीत रस्त्यावर काम करताना कर्मचाऱ्याचा मृत्यू वा अपंगत्व आल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल कर्मचारी करीत आहेत.
पनवेलमध्ये बुधवारी नादुरुस्त एसटी बस दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱयांना मागून आलेल्या वाहनाची धडक बसली. त्या घटनेने प्रशिक्षणार्थी कर्मचाऱयांना बसगाड्या दुरुस्तीसाठी रस्त्यावर पाठवण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यशाळांमध्येच काम देणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱयांना 1 कोटी रुपयांचे अपघाती विमा संरक्षण देण्याचे प्रस्तावित केले आहे. ते विमा संरक्षण लागू होणे बाकी आहे. परंतु त्या विमा संरक्षणाच्या कक्षेत प्रशिक्षणार्थी कर्मचाऱयांचा समावेश नाही. असे असताना प्रशिक्षणार्थींना विभागीय कार्यशाळेतून आगार आणि रस्त्यांवर गाडय़ा दुरुस्त करण्यासाठी पाठवले जात असल्याने कर्मचारी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
– एसटी महामंडळाच्या मुंबई विभागाची विद्याविहार येथे विभागीय कार्यशाळा आहे. या ठिकाणी 198 प्रशिक्षणार्थी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना एसटी आगारांमध्ये तसेच रस्त्यांवर मधेच ब्रेकडाऊन होणाऱ्या गाड्या दुरुस्त करण्यासाठी पाठवले जात आहे. त्यामुळे प्रशिक्षार्थी कर्मचाऱयांनाही विमा संरक्षण लागू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.