इंग्लंडने  सामना जिंकला अन् मालिका हिंदुस्थानने, टी-20 मालिकेत हिंदुस्थानी महिलांची बाजी

Photo - BCCI

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या पाचव्या अन् अखेरच्या टी-20 क्रिकेट सामन्यात यजमान इंग्लंडच्या महिला संघाने हिंदुस्थानवर विजय मिळविला. मात्र तरीही हिंदुस्थानी महिलांनी 3-2 फरकाने मालिका जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. कारण हिंदुस्थानी महिलांनी कारकीर्दीत प्रथमच इंग्लंडमध्ये टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.

हिंदुस्थानी महिला संघाने 2006 साली इंग्लंडमध्ये टी-20 क्रिकेट खेळायला सुरुवात केली, मात्र या देशात टी-20 मालिका जिंकण्यासाठी हिंदुस्थानला तब्बल 19 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. अखेरच्या टी-20 सामन्यात हिंदुस्थानकडून शफाली वर्मा हिने 41 चेंडूंत 13 चौकार व एका षटकारासह 75 धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर (15), रिचा घोष (24) व राधा यादव (नाबाद 14) यांनाच दुहेरी धावा करता आल्याने हिंदुस्थानने 7 बाद 167 अशी असुरक्षित धावसंख्या उभारली. इंग्लडकडून चार्ली डीनने 3, तर सोफी एक्लेस्टोन हिने 2 फलंदाज बाद केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची अखेरच्या षटकात चांगलीच दमछाक झाली. सोफिया डंकले (46) व डॅनी वॅट-हॉज (56) यांनी 101 धावांची सलामी देत इंग्लंडला खणखणीत सुरुवात करून दिली होती. या दोघी बाद झाल्यानंतर कर्णधार टॅमी ब्युमोंट (30) वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने सामना रोमहर्षक वळणावर पोहोचला. इंग्लंडला अखेरच्या षटकात विजयासाठी 6 धावांची गरज होती. अरुंधतीने पहिल्या व तिसऱ्या चेंडूवर अनुक्रमे ब्युमोंट व एमी जोन्स (10) यांना बाद केले, मात्र चौथ्या चेंडूवर 3 धावा निघाल्याने सामना हिंदुस्थानच्या हातातून निसटला. पुढील उर्वरित दोन चेंडूवर 2 धावा करीत इंग्लंडने विजयावर शिक्कामोर्तब केले. मात्र हिंदुस्थानने आधीच चारपैकी तीन लढती जिंकून मालिका खिशात घातली होती. त्यामुळे आजची लढत हिंदुस्थानच्या दृष्टीने केवळ एक औपचारिकता होती. हिंदुस्थानकडून दीप्ती शर्मा व अरुंधती रेड्डी यांनी 2-2 फलंदाज बाद केल्या, तर राधा यादवला एक बळी मिळाला.