
आंतरराष्ट्रीय टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही हिंदुस्थानचा स्टार फलंदाज विराट कोहली विक्रमांचे इमले रचत आहे. आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या टी-20 क्रमवारीत त्याने 909 गुणांपर्यंत झेप घेतलीय. याचबरोबर आयसीसी पुरुष क्रमवारीत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 900 गुणांचा टप्पा पार करणारा तो क्रिकेटविश्वातील एकमेव फलंदाज ठरला आहे, हे विशेष. गेल्या वर्षी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम लढतीत 76 धावांची खेळी करणाऱया कोहलीने आपल्या टी-20 क्रमवारीत मोठी सुधारणा केली. विक्रमानुसार आयसीसीने त्याच्या मानांकनाला 897 वरून थेट 909 पर्यंत नेले आहे. ही टी-20 क्रमवारीत फलंदाजाने मिळवलेले तिसरे सर्वाधिक गुण आहेत. हिंदुस्थानचा सूर्यकुमार यादव (912) आणि इंग्लंडचा डेव्हिड मलान (919) यांच्यानंतर विराट तिसऱया क्रमांकावर आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत विराटचे सर्वोच्च 937 गुण मिळवले आहेत. हे हिंदुस्थानी खेळाडूने मिळवलेले आजवरचे सर्वाधिक गुण आहेत. 2018 मध्ये इंग्लंड दौऱयावर त्याने 10 डावांत दोन शतके व तीन अर्धशतकांसह 593 धावा फटकविल्या होत्या. तसेच त्याने 2018 मध्ये इंग्लंड दौऱयावरच वन डे रेटिंगमध्येही 909 गुण गाठले होते.