
लॉर्ड्सवरील निसटत्या पराभवाने हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींचे हृदय दुखावलेय. या पराभवानंतर हिंदुस्थानच्या जगज्जेत्या संघाचे खेळाडू मदन लाल यांनी विराट कोहलीने पुन्हा कसोटी क्रिकेट खेळावे, अशी इच्छा बोलून दाखवताना त्याला पुनरागमन करण्याचे आवाहन केले आहे.
1983 साली हिंदुस्थानला पहिल्यांदा जगज्जेतेपद मिळवून देणाऱ्या संघात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या मदन लाल यांनाही लॉर्ड्सचा पराभव जिव्हारी लागली आणि त्यांचे विराटप्रेम पुन्हा जगासमोर आले. आजही विराटचा हिंदुस्थानी क्रिकेटप्रती असलेला वेडेपणा अतुलनीय आहे. त्यांच्या नुसत्या उपस्थितीनेही संघातील खेळाडूंना स्फुरण चढते. त्यानेच नव्या पिढीला कसोटी क्रिकेटचे महत्त्व पटवून दिलेय. त्यामुळे विराटने कसोटीत पुनरागमन करावे. पुनरागमनामध्ये काहीही वाईट नाही. या मालिकेत शक्य नसेल तर पुढच्या मालिकेत पुन्हा पांढरे कपडे परिधान करावे, असे आवाहन मदन लाल यांनी केले आहे. मदन लाल यांचे आवाहन विराट गांभीर्याने घेईल असे तूर्तास वाटत नसले तरी क्रिकेट इतिहास अनेक खेळाडूंनी निवृत्तीनंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरून इतिहास घडवला आहे. याची अनेक उदाहरण असून इम्रान खानचे नाव सर्वात पुढे आहे.
विराट कोहलीने कसोटी सामन्यांत 30 शतकांसह 9230 धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने 41 कसोटी सामन्यांत विजय नोंदवले आहेत. एवढेच नव्हे तर त्याच्या बॅटीतून 7 द्विशतकेही झळकली आहेत. हे सारे पराक्रम फक्त आणि फक्त विराटच्याच नावावर आहेत. तो केवळ फलंदाज म्हणूनच नव्हे तर एक कर्णधार म्हणूनही हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी आहे. सध्या इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी विराटने आपली कसोटीतून निवृत्ती जाहीर करून अवघ्या हिंदुस्थानी क्रिकेट जगताला हादरवले होते.