Ratnagiri News – वाटद MIDC विरोधाचा आवाज बुलंद होणार! 19 जुलैला ॲड.असीम सरोदे यांची खंडाळ्यात जनआक्रोश सभा

रत्नागिरी तालुक्यातील वाटद परिसरातील दोन हजार दोनशे एकर जमीन एमआयडीसीच्या नावाखाली राज्य सरकार हडप करत आहे. प्रस्तावित वाटद एमआयडीसीला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. एमआयडीसीला कवडीमोल दराने आमच्या जमिनी देणार नाही, असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले असताना ग्रामस्थांचा हा लढा अधिक बुलंद होणार आहे. शनिवारी 19 जुलै रोजी सकाळी 10 वाजता खंडाळा येथे जनआक्रोश जाहिर सभा होणार आहे. यासभेत मानवाधिकार विश्लेषक ॲड. असीम सरोदे मार्गदर्शन करणार आहेत. वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समितीने या जनआक्रोश सभेचे आयोजन केले आहे.

वाटद येथे एमआयडीसीसाठी दोन हजार दोनशे एकर जमीन हस्तांतरित करण्यात येत आहे. त्यापैकी एक हजार एकरमध्ये रिलायन्स डिफेन्स ही कंपनी आपला प्रकल्प उभारणार आहे. उर्वरित बाराशे एकर जमीन कुणाला देणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या वाटद एमआयडीसीच्या जमीन हस्तांतरण संदर्भात प्रांताधिकारी कार्यालयात सुणावणी सुरू असून ग्रामस्थांनी वाटद एमआयडीसीला आपल्या जमिनी द्यायला विरोध केला आहे. भविष्यात एमआयडीसी झाल्यानंतर कशा प्रकारे रोजगार मिळणार? उर्वरित बाराशे एकर जमिनीवर कोणते प्रकल्प येणार? अशा प्रश्नांची उत्तरे ग्रामस्थांना अद्याप मिळालेली नाहीत. वाटद एमआयडीसीला असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि.19 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सर्वसाक्षी श्रध्दा प्रतिष्ठान खंडाळा येथे जनआक्रोश जाहिर सभा आयोजित केली आहे. यासभेत मानवाधिकार विश्लेषक ॲड.असीम सरोदे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲड.रोशन पाटील उपस्थित राहणार आहेत.