
>> साधना गोरे
औद्योगिक क्रांती व्हायच्या आधी जगभर पशुपालन, कृषी यांच्याशी संबंधित जीवन पद्धती अस्तित्वात होती. साहजिकच सर्वच भाषांमध्ये या संस्पृतींशी निगडित शब्दांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात झालेली दिसते. शेती व्यवसायाशी अत्यंत जवळीक असलेले आपल्याकडील धान्य पाखडण्याचं एक साधन म्हणजे सूप. पिठाच्या गिरण्या यायच्या आधी घरोघरच्या स्त्रियांची पहाट सूप आणि जातं या दोन साधनांनीच तर सुरू व्हायची!
‘सूप’ या शब्दाचं मूळ संस्पृतमधील ‘शूर्प’ या शब्दात आहे, असं कृ. पां. पुलकर्णी म्हणतात, पण ते नंतर झालेलं संस्पृतीकरण असावं असंही ते पुढे नमूद करतात. मराठीप्रमाणे हिंदीतही ‘सूप’ असाच शब्द आहे. गुजरातीमध्ये ‘सुपडूं’, सिंधीमध्ये ‘सुपू’ असा त्याचा उच्चार केला जातो.
सुपात धान्य पाखडलं जातं म्हणून काही ठिकाणी त्याला ‘पाखडण’ असंही म्हणतात. लहान आकाराच्या सुपाला ‘सुपली’ म्हटलं जातं. घरातली केरभरणी लहान सुपाच्या आकाराचीच असल्याने तिलाही ‘सुपली’ म्हटलं जातं. हत्तीच्या आणि हत्तीचं मुख असलेल्या गणेशाच्या भव्य कानांना सुपाची उपमा दिली जाते, तर आनंदानं मन फुलून आल्यावर ‘काळीज सुपाएवढं’ होतं. शेजाऱयावर वाईट प्रसंग आला म्हणून एखाद्याला आनंद होतो, पण त्यालाही शेवटी त्याच प्रसंगाला सामोरं जायचं असतं या अर्थाने ‘सुपातले हसते, जात्यातले रडते’ ही म्हण आजही वापरली जाते. एखादं मोठं काम करताना त्या ओघात एखादं लहान काम करावं लागलं तर त्याचे विशेष असे कष्ट पडत नाहीत या अर्थाने ‘भरल्या गाडय़ास सूप जड नाही’ असं म्हटलं जातं.
शेतातून धान्याची कणसं काढून धान्य पोत्यात भरेपर्यंत शेतकऱयाला त्यावर बरीच प्रक्रिया करावी लागते. पूर्वी खळ्यावरील धान्यांतील फोलपटं काढण्यासाठी ते वारवावं लागे. म्हणजे धान्याने भरलेलं सूप हाताने उंच धरून त्यातील धान्य खाली सोडलं जाई. मात्र हे करताना वाऱयाची दिशा लक्षात घ्यावी लागते. तरच धान्यापेक्षा हलकी असणारी फोलपटे, निकृष्ट दाणे म्हणजे असार पुढे जाऊन पडते. यावरून ‘वारा बघून सूप दाखवावं’ अशी म्हण पडली. म्हणजे प्रसंग येईल त्याप्रमाणे त्याला तोंड दिले पाहिजे. रोजचं दळण निवडण्यासाठी सूप ही घरातली अत्यावश्यक वस्तू असल्याने ते अधिक टिकण्यासाठी शेणाने सारवून घट्ट केलं जाई. यावरून ‘म्हातारं माणूस अन्नानं बळकट, फाटपं सूप शेणानं बळकट’ अशी म्हण प्रचलित आहे.
‘अधिवेशनाचे किंवा संमेलनाचे सूप वाजले’ अशा वाक्प्रयोगांतून ‘सूप वाजणे’ हा वाक्प्रचार आजही मोठय़ा प्रमाणात वापरला जातो. या सूप वाजण्याचा संबंधही खळ्यातल्या धान्याशीच आहे. पूर्वी शेतातली सगळी कामे यंत्राशिवाय करावी लागायची तेव्हा खळे महिना-महिना चालायचे. खळ्यातला कामाचा सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे धान्याची रास घरी नेणं. ही रास घरी नेताना शेवटचा हात म्हणून धान्य पुन्हा एकदा सुपात घेऊन झपकारा दिला जाई. दुसरीकडे रास वाहून नेण्याचं कामही सुरू असतं. धान्याच्या राशीला सूप थडकलं तर दाण्यामुळे आवाज होत नाही. हळूहळू ही रास संपत येते अन् खळ्याची जमीन उघडी पडू लागते. असे जमिनीलगतचे दाणे भरताना सुपाचा फटकारा जमिनीला बसून आवाज होतो. या आवाजाने पुणीही न सांगता रास आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे हे कळतं. सूप वाजणं ही खळं संपल्याची खूण असते. कालांतराने कोणतंही कार्य संपलं या अर्थाने ‘सूप वाजणं’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.
हे झालं धान्य पाखडण्याच्या सुपाविषयी, पण संस्पृत व पाली भाषांमध्ये ‘सूप’ असाच आणखी एक शब्द आहे. त्याचा अर्थ आहे, आमटी, वरण, अर्प, रस. संस्पृतमध्ये यावरूनच ‘सूपकार’ म्हणजे ‘आचारी’ – ‘स्वयंपाकी’, ‘सूपशास्त्र’ म्हणजे ‘पाकशास्त्र’ हे शब्द तयार झालेले दिसतात. इंग्रजीमध्ये भाज्या, मांस इत्यादींपासून बनवलेले सार म्हणजे एक प्रकारची आमटी. यालाही soup म्हटलं जातं. जर्मन भाषेत याच सुपाला ‘झोपंएए’ (suppe), तर स्पॅनिशमध्ये ‘सोपाएए’ (sopa) म्हटलं जातं. या भाषांमधील हे साम्य चिंतनीय आहे. पिण्याचं सूप आणि धान्य पाखडण्याचं सूप यांचं मूळ एक आहे की, ते स्वतंत्र शब्द आहेत हे माहीत नाही, पण या दोन्ही सुपांमध्ये एका बाबतीत मात्र साम्य आहे, ते म्हणजे पिण्याचं सूप हे त्या पदार्थाचं सार म्हणजे सत्त्व असतं अन् धान्य पाखडायचं सूपसुद्धा सत्त्व म्हणजे चांगलं धान्य निवडण्याचं काम करत असतं!