बंगळुरूतील चेंगराचेंगरीसाठी आरसीबीच जबाबदार, कर्नाटक सरकारचा अहवाल जनतेसमोर सादर

आयपीएलचे जेतेपद प्रथमच जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाच्या विजयोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीसाठी आरसीबी संघच जबाबदार असल्याचा ठपका कर्नाटक सरकारने ठेवला आहे. 4 जूनला चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला व 50 हून अधिक जखमी झाले होते.

हा अहवाल कर्नाटक उच्च न्यायालयाने सरकारला गोपनीय ठेवण्यास नकार दिल्यानंतर आज गुरुवारी सार्वजनिक करण्यात आला. न्यायालयाकडून मिळालेल्या या अहवालाच्या प्रतीनुसार आरसीबी व्यवस्थापन, डीएनए नेटवर्क्स प्रा. लि. (इव्हेंट मॅनेजमेंट पंपनी) आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए) यांच्या सहकार्याने पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता आणि कोणतेही अधिकृत परवाने न मिळवता हा विजयोत्सव आयोजित  करण्यात आला आणि त्यातच ही दुर्दैवी घटना घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

उशिरा सूचना, पोलिसांची नकारात्मक भूमिका

केएससीएचे सीएओ शुभेंदु घोष यांनी 3 जून रोजी संध्याकाळी 6.30 वाजता डीएनए मॅनेजमेंच पंपनीच्या मार्फत पोलिसांना एक इ-मेलद्वारे कळवले की, आरसीबी विजयी झाल्यास दुसऱया दिवशी विजयोत्सव आयोजित करणार आहेत. मात्र, पोलिसांनी ही विनंती नाकारला. कारण आयोजकांकडून अंदाजे गर्दीचा आकार, सुरक्षेची तयारी, वाहतूक नियोजन याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नव्हती. शिवाय ही सूचना खूपच उशिरा आली होती.